बिहारमध्ये मामाने भाचीसोबतच प्रेमविवाह केल्याची घटना घडली आहे. मात्र हा प्रेमविवाह सरकारी अधिकारी असलेल्या मामाला चांगलाच महागात पडला आहे. याप्रकरणी बिहार सरकारने बेगुसरायचे उपायुक्त शिवशक्ती कुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सरकारी सेवक नियमावलीचे उल्लंघन केले असून पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका शिवशक्ती कुमार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
निलंबनासह शिवशक्ती कुमार यांची बदलीही करण्यात आली आहे. शिवशक्ती कुमार हे बेगूसरायमध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत होते. 10 ऑगस्ट रोजी ते आपल्या मूळगावी गेले होते. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. त्याच दिवशी सजल नामक तरुणी त्यांना भेटायला कार्यालयात आली होती. यानंतर काही वेळाने दोघेही कार्यालयातून निघून गेले आणि फरार झाले. काही दिवसांनी दोघांनी प्रेमविवाह केल्याचे उघड झाले.
तरुणी गायब असल्याने तिचे नातेवाईक बेगूसराय येथे शिवशक्ती कुमार यांच्या कार्यालयात चौकशीसाठी आले. यावेळी त्यांना 12 ऑगस्ट रोजी तरुणी कार्यालयात आली होती आणि त्यानंतर दोघे गायब झाल्याचे कळले. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी महापालिका आयुक्त सत्येंद्र प्रसाद आणि महापौर पिंकी देवी यांच्याकडे तक्रार केली. तसेच वैशाली पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रारही नोंदवली.
शिवशक्ती कुमार आणि सजल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत सजलने आपले कुटुंबीय खोटे बोलत असल्याचा आरोप केला. आपले अपहरण झाले नसून स्वतःच्या मर्जीने मंदिरात शिवशक्ती कुमार यांच्याशी विवाह केल्याचे तरुणीने म्हटले.