मोनेगिरी- विनय एकमेवाद्वितीय

>> संजय मोने

तो वेगळाच होता. अगदी भिन्न म्हणावा असा. एकांकिका दिग्दर्शित करत होता आणि त्या वेळी छोटय़ा पडद्यावर काम अन् मुंबईत वरळीला नोकरी करत होता, पण त्याचं चौफेर लक्ष असायचं. तो शिवाजी मंदिरला यायचा. तिथे असंख्य लोक आपल्या भविष्याची स्वप्नं बघत लटकत असायचे. तो चौफेर नजर फिरवायचा. आम्हाला त्या काळात असं वाटायचं की, कुठे काही झालं तरी ‘विनय आपटे’ नावाचा महामानव आपल्यासाठी आहे.

उर्मट… रोखठोक… धाडसी… मवाली…सज्जन… साहसी… बेफिकीर… आणि इतर अनेक विशेषणं वापरून ज्याचं पूर्ण वर्णन झालं आहे की नाही, असा संभ्रम त्याला भेटलेल्या प्रत्येक माणसात निर्माण होतो तो एकमेव माणूस म्हणजे विनय. त्याला ओळखणारा प्रत्येक माणूस “मी विनयला पूर्ण ओळखतो, अगदी तळव्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत, अगदी शेवटच्या टोकापर्यंत’’ असं म्हणणारा त्याला असलेल्या अर्धवट माहितीवर बोलतोय याची खूणगाठ मनाशी बाळगावी असा तो आहे. दुर्दैवाने आता ‘तो होता’ असं म्हणावं लागतं. कारण अत्यंत बुद्धिमान आणि ज्याला आपण हल्ली मराठीत ‘क्रिएटिव्ह’ म्हणतो तसा तो होता.

साधारण 1978-79 च्या सुमारास आम्ही नाटकाशी म्हणजे एकांकिकांशी निगडित होतो. कुणालाही, अगदी आम्हालाही कळणार नाही अशा एकांकिका किंवा नाटकं रंगमंचावर सादर होत होती. तेव्हा विनय दूरदर्शनला नोकरी करत होता. त्या काळात सादर होणाऱया कार्यक्रमांच्या पासंगालाही पुरणार नाहीत असे कार्यक्रम तेव्हा सादर होत असत. नोकरी सांभाळून तो प्रायोगिक नाटय़ चळवळीत होता. खरं तर ते सगळं सांभाळून तो नोकरी करत होता. (कदाचित तो नोकरीत नसेल, कंत्राटी असेल, पण हा भेद त्या काळात कोणाच्याही लक्षात आला नसेल किंवा लक्ष दिलं नसेल.) एक मोटरसायकल घेऊन तो विमानाच्या गतीने ती चालवत असंख्य कामं करत होता. त्याच्या मागच्या आसनावर बसलेला एक सहकारी त्याच्या वेगाला घाबरून त्याला कळणार नाही अशा बेताने अलगद उतरून गेला होता. विनयच्या हे गावीही नव्हतं. तो त्या सहकाऱयाबरोबर (हल्ली ‘बरोबर’ऐवजी ‘सोबत’ हा शब्द मराठीत घुसला आहे. त्यामुळे तुमच्या सोयीने जसा आवडेल तसा वाचावा.) पुढच्या कार्यक्रमाबद्दल बोलत राहिला. एका क्षणाला त्याला लक्षात आलं, मागे कोणीच नाही. एक शिवी पुटपुटत तो अजून वेगाने निघून गेला. वेग हा त्याच्या आयुष्याचा मंत्र होता का? अजिबात नाही. सगळ्यांना भेटायची एक वेळ दिली की, विनय कधीच वेळ पाळायचा नाही. हातात कैरी घेऊन एक जण जर त्याच्या येण्याची वाट बघत राहिला तर विनय त्या जागी पोहोचेपर्यंत हातातल्या कैरीचा पूर्ण पिकलेला आंबा झालेला असायचा.

तरीही आज त्याच्याबद्दल इतक्या आसक्तीने लिहावंसं वाटतं. कारण तो वेगळाच होता. अगदी भिन्न म्हणावा असा. एकांकिका दिग्दर्शित करत होता आणि त्या वेळी छोटय़ा पडद्यावर मुंबईत वरळीला नोकरी करत होता, पण त्याचं चौफेर लक्ष असायचं. कधीतरी त्याच्या येझदी नावाच्या मोटरसायकलवरून तो शिवाजी मंदिरला यायचा. तिथे असंख्य लोक आपल्या भविष्याची स्वप्नं बघत लटकत असायचे. तो चौफेर नजर फिरवायचा.

“ए! जरा इकडे ये! किती दिवस पूर्ण जेवला नाहीयेस?’’
“सर! जेवलो ना!’’
“किती दिवसांपूर्वी?’’ त्याच्या घनघोर बेसच्या आवाजात तो विचारायचा.
“हे…असंच…’’ समोरचा पुटपुटत बोलायचा प्रयत्न करायचा..
“समजलं! उद्या वरळीला ये. एका कार्यक्रमात आहेस तू!’’ आवाज तसाच दरडावणीच्या जवळपास जाईल असा.
“काय भूमिका आहे?’’ समोरचा माणूस, का कुणास ठाऊक, पण प्रश्न विचारायचा.
“उद्या आणि पुढे पंधरा दिवस भरपूर जेवशील इतके पैसे मिळतील. आता फाके मारतोयस ना? कोणी सत्यजित रे किंवा विजय आनंद येणारे तुला विचारायला? ये उद्या.’’ अत्यंत वेगाने त्याची मोटरसायकल निघून जायची. अशा असंख्य लोकांना त्याने अन्नदान केलं होतं त्या काळात.

वेगवान विचार आणि त्यावर अंमल करणारा मेंदू ही त्याची बलस्थानं होती. त्यामुळे साहजिकच त्याने ती सरकारी नोकरी सोडली आणि तो धडपड करू लागला. त्या काळात आमच्यासारखे अनेक लोक धडपड करत होते, पण त्यात वेगळेपण असं होतं की, तो संधी मिळायची वाट बघत नव्हता. ती आपल्याकडे खेचून घ्यायच्या प्रयत्नात होता. त्याचे आणि माझे संबंध कायम शिवीगाळ आणि आणि घट्ट मिठी (त्यातसुद्धा मिठी मारताना ‘मा……द’) असे शब्द कायम यायचे. जरा मागे जाऊन एक घटना सांगावीशी वाटते.

दूरदर्शनवर एक कार्यक्रम व्हायचा. तो त्यानेच लोकप्रिय केला होता. तर तो पन्नास मिनिटांचा होत असे. एकदा त्या कार्यक्रमातली चाळीस की काहीतरी मिनिटांचं चित्रीकरण झालं होतं. दहा मिनिटं राहिली होती. आता काय करणार? पण विनयच तो! न डगमगता तो म्हणाला, “आपण लाइव्ह करू!’’ त्या दहा मिनिटांच्या कार्यक्रमात काम करणाऱया नटांना त्याने बजावलं, “चुकू नका. चुकलात तर मेलात.’’

दहा मिनिटांचा कार्यक्रम लाइव्ह जोडला गेला आणि कार्यक्रम जोरदार गाजला. आज विनय आपल्यात नाही, पण त्याची उणीव वारंवार भासते. आम्हाला त्या काळात असं वाटायचं की, कुठे काही झालं (ते ‘काही’ कुठलं पेय पिऊन कधी व्हायचं या तपशिलात नको शिरायला) तरी ‘विनय आपटे’ नावाचा महामानव आपल्यासाठी आहे. आम्ही ती वेळ कधी येऊ दिली नाही, पण ज्यांनी कोणी येऊ दिली तेव्हा तो त्या स्थळी हजर होऊन त्यांची सुटका करायचा. विनयच्या नावावर अनेक कांड करणारे आजही आहेत.

पुढे त्याने स्वतची नाटय़संस्था सुरू केली. त्याच्या दोन नाटकांत मी होतो. मस्त मजा आली. त्यावेळी त्याची बायको वैजयंती त्याच्याबरोबर असायची. तिने त्याला जरा रानमाणूस ते माणूस इथपर्यंत बदललं होतं. त्याने ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाची निर्मिती केली. त्यात मी आणि डॉ. गिरीश ओक काम करत होतो. गमतीची गोष्ट म्हणजे आम्हाला दोघांना दिलेल्या भूमिका फारशा आवडल्या नव्हत्या. त्यावर विनय म्हणाला,
“मला तुम्ही दोघे पाहिजेत. एक काम करू या. अदलाबदल करून काम करा.’’ ती सूचना नव्हती, आज्ञा होती.

त्या नाटकाने धुमाकूळ घातला. आठशेच्या वर प्रयोग झाले. त्यातसुद्धा त्याने एक अजब सूचना केली. 200 प्रयोगाला दुप्पट, 300 प्रयोगाला तिप्पट असं ठरलं. हे फक्त त्याच्याच डोक्यात येऊ शकतं.

यादरम्यान माझं आणि सुकन्या कुलकर्णी यांचं लग्न ठरलं. त्यावर त्याचा आणि सुकन्याचा संवाद असा होता, “कशाला? तुला अजून चांगला मुलगा मिळेल.’’
“नाही. माझं ठरलंय.’’
“सहा महिन्यांत घटस्फोट होईल…सांगतो तुला…ऐक माझं.’’
“नाही होणार…’’
मग विनय माझ्याशी बोलला.
“मोन्या (तो याच नावाने माझ्याशी बोलायचा) माझ्या खिशात पिस्टल असतं, पण वापरलं नाहीये. लग्नानंतर ती वेळ आणू नकोस.’’

आज मी आणि माझी बायको यांचा संसार गेली पंचवीस वर्षे सुखात सुरू आहे. वैजयंती आपटे, विहान आपटे आणि माझी मुलगी जुलिया मोने एकमेकांशी उत्तम संबंध ठेवून आहोत, पण विनय नाही.

देव्हारा तर आहे, पण आत मूर्ती नाही, जिने आम्हाला आधार दिला, बळ दिलं, जगण्याचा मार्ग दाखवला. त्या काळात आम्ही म्हणायचो, आकाशात देव आहे, तो कुठे भेटणार! पण इथे पृथ्वीतलावर विनय आहे ना! मग काय फिकीर आहे?

[email protected]