बहिणींवर अत्याचार होत असताना कंसमामा निर्लज्जासारखा राख्या बांधून फिरतोय! भर पावसात उद्धव ठाकरे मिंध्यांवर गरजले

बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना भवन येथे भर पावसात महिला आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत आपला आक्रोष व्यक्त केला. नराधमाला फाशी द्या, फाशी द्या… मिंधे सरकार हाय हाय… कंस मामा हाय हाय…राजीनामा द्या… राजीनामा द्या… कंसमामा राजीनामा द्या…मिंधे सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय…निषेध असो, निषेध असो… मिंधे सरकारचा निषेध असो…अशा घोषणांनी शिवसेना भवन आणि दादर परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहिणींवर अत्याचार होत असताना राख्या बांधून निर्लज्जासारखं फिरणाऱ्या कंसमामावर आसूड ओढला. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, नेते, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना भवन परिसरात जमलेल्या नागरिकांना संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आजही महाराष्ट्रात जिवंत मनं आहेत याचे दर्शन घडले. महाराष्ट्रावर मुर्दाड सरकार राज्य करतंय. या सरकारची मला कीव येते. सरकार नराधमांवर पांघरून घालण्याचे काम करतंय. त्यांना पाठीशी घालण्याचे काम करतंय. बदलापूरमधील दृष्कृत्य झाल्यानंतर सरकारने खणखणीत भूमिका घ्यायला पाहिजे होती. ज्यावेळी सर्व दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याखेरीच पर्याय नसतो.’

‘आजचा बंद कडकडीत झाला असता. याची जाणीव सरकारला झाली. त्यांच्यात संकटांचा सामना करण्याची हिंमत नाही. संकटांचा बंदोबस्त करण्याची ताकद नाही. असे हे निर्ढावलेले सरकार आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत आहे. महाराष्ट्र बंद कडकडीत होईल याचा अंदाज आल्याने सरकारने त्यांचे चेलेचपाटे कोर्टात पाठवले आणि महाराष्ट्र बंदमध्ये अडथळा निर्माण केला’, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालय तारीख पे तारीख देत आहे. न्याय मिळेल याचा विश्वास आहे. पण न्यायालयही एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकते हे दाखवल्याबद्दल धन्यवाद, असा टोला लगावत न्यायालयाने ठरवले तर ते तात्काळ निर्णय घेऊ शकते असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

जरी तुम्ही आमच्या बंदला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये, प्रत्येक घरामध्ये अत्याचाराविरुद्ध आणि मिंधे सरकारविरुद्ध मशाल धगधगतेय. महिला, बहिणी, माता, मुली यांना सुरक्षा पाहिजे म्हणून हा बंद पुकारला होता. त्या बंदमध्ये तुम्ही अडथळा आणला. गेल्या आठवड्यात 21, 22 ऑगस्टला भारत बंद झाला होता. आपल्या राज्यात तो जाणवला नसला तरी अनेक राज्यांमध्ये रेल्वेही बंद झाल्या होत्या. तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते? असा खणखणीत सवाल तर नराधमाला पाठीशी घालणारे याचिकाकर्तेही विकृत असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच महिलांवर अत्याचार करणाऱ्याला आणि त्यांच्या पापांवर पांघरून घालणाऱ्या शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

मराठा समाजाचा विषय असेल, एसटीचा विषय असेल, काही माणसं या राज्यकर्त्यांची सदा आवडती झाली आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला. सदा आवडती लोकं कोण आहेत, त्यांची लायकी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही केले ते तुम्हाला शोभा देणारे नाही. तुम्ही यात राजकारण आणले. माझ्या सुरक्षेच्या आड का येतोय? असे म्हणत आज सर्व घरातील महिला तुम्हाला जाब विचारताहेत, असे सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचे आंदोलन संपता कामा नये. पुढचे काही दिवस आपल्या शहरात, गावातील बस डेपो, रेल्वे स्टेशन, रिक्षा स्टँड जिथे जिथे सार्वजनिक चौक आहेत तिथे बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित या अंतर्गत स्वाक्षऱ्यांची मोहीम घ्या. या स्वाक्षऱ्या गोळ्या करून आपण उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे. रोज कुठे ना कुठे काहीतरी घडत आहे. मुंबई, बदलापूर, अंबरनाथ, सोलापूर येथून घटना कानावर येताहेत. पण हे कंसमामा राख्या बांधत फिरताहेत. बहिणीवर अत्याचार होतोय आणि निर्लज्ज राख्या बांधून फिरताहेत. यात कुठली अडचण येऊ नये म्हणून आंदोलनात आडकाठी करताहेत. एवढे निर्लज्ज सरकार यापूर्वी महाराष्ट्राने पाहिले नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. एका बाजुला नराधमावरती पांघरून घालणारे विकृत सरकार आहे, दुसऱ्या बाजुला संस्कारक्षम महाराष्ट्रात विकृत सरकारविरोधात लढा देणारी माणसं आहेत, असेही ते म्हणाले.

तुम्ही आमचा बंद बंद केला असला तरी आमचा आवाज बंद करू शकणार नाहीत. आमचा आवाज याहीपेक्षा मोठा होईल, असे ठणकावत सरकार माताभगिनींचे रक्षण करायला समर्थ नसेल तर पुत्र आणि बांधव म्हणून शिवसैनिक त्यांचे रक्षण करायला समर्थ आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपण केलेल्या शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. त्या देखील महिला असून गेल्या दोन वर्षापासून हा कायदा तिथे धूळ खात पडला आहे. त्यावरून धूळ झटकवावी आणि सरकारलाही झडकवून महाराष्ट्रात हा कायदा अंमलात आणावा, अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली.