बांगलादेश 5 बाद 316, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर दमदार मजल

बांगलादेशच्या शादमन इस्लाम (93), मोमिनुल हक (50), मुशफिकर रहीम (ना. 55) आणि लिटन दास (ना. 52) यांच्या खणखणीत अर्धशतकी खेळींच्या जोरावर बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर 5 बाद 316 अशी दमदार मजल मारली. पाकिस्तानने काल आपला पहिला डाव 6 बाद 448 धावांवर घोषित केला. त्यांच्या डावात सऊद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी पाचव्या विकेटसाठी 240 धावांची भागी रचली होती.

काल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बिनबाद 27 वर असलेल्या बांगलादेशला पहिल्या सत्रातच दोन धक्के बसले. मात्र त्यानंतर शादमन इस्लामने मोमिनुल हकसह 94 धावांची भागी रचली. शादमनचे शतक अवघ्या 7 धावांनी हुकले. मोहम्मद अलीने त्याचा त्रिफळा उडवला. मग शाकिब अल हसन (15) बाद झाला. पण त्यानंतर मुशफिकर रहिम आणि लिटन दासने 98 धावांची अभेद्य भागी रचत संघाला तीनशेचा टप्पा गाठून दिला.