ही युद्धाची वेळ नाही… मोदींचे युक्रेनमध्ये पुन्हा तेच तुणतुणे
ही युद्धाची वेळ नाही, रणांगणावर तोडगा निघत नाही, चर्चा करा आणि युद्ध संपवा, असे मी रशियात पुतीन यांना स्पष्टपणे सांगितले होते. तुम्हालाही तेच सांगतो, असे जुनेच तुणतुणे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमध्ये वाजवले. युव्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदी म्हणाले की, युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रत्येक प्रयत्नात भारत ‘सक्रिय भूमिका’ बजावण्यास सदैव तयार आहे. उभय नेत्यांमधील चर्चा प्रामुख्याने युद्ध संपवण्याच्या मार्गांवर आणि व्यापार, संरक्षण, आरोग्य सेवा, औषधनिर्माण, कृषी आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्यावर केंद्रित होती.
एअर इंडियाला 90 लाखांचा दंड
विमान वाहतूक महासंचालकांनी टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अपात्र वैमानिकांकरवी विमान चालवल्याबद्दल 90 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एअर इंडियाचे उड्डाण संचालक पंकुल माथूर आणि प्रशिक्षण संचालक मनीष वासवडा यांनाही या चुकीबद्दल अनुक्रमे 6 लाख रुपये आणि 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 10 जुलै रोजी एअरलाइननेच दिलेल्या अहवालाद्वारे ही घटना उघड झाली होती.
नागपूर तुरुंगात छळ केल्याचा प्रा. साईबाबा यांचा आरोप
माझ्या शरीराच्या डाव्या बाजूला अर्धांगवायू झाला असूनही नागपूर कारागृह अधिकाऱ्यांनी 9 महिने रुग्णालयात नेले नाही, फक्त वेदनाशामक गोळ्या दिल्या, असा आरोप दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांनी केला आहे. कथित माओवादी संबंधांच्या खटल्यातून त्यांची अलीकडेच निर्दोष मुक्तता झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी मे 2014 मध्ये माओवाद्यांशी संबंध असल्याबद्दल त्यांना दिल्लीतून अटक केली होती. आता ते शारीरिक हालचालींसाठी व्हीलचेअरवर अवलंबून आहेत.
गाझामधील 90 टक्के रहिवासी विस्थापित
इस्त्रायलने गाझावासीयांना अनेकदा दिलेल्या स्थलांतरांच्या आदेशांमुळे इस्रायल-हमास संघर्ष सुरू झाल्यापासून तेथील 2.1 दशलक्ष रहिवाशांपैकी 90 टक्के विस्थापित झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेने म्हटले आहे.
केजरीवाल अटकेचे सीबीआयकडून समर्थन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चौकशीत चलाखी आणि असहकार करत असल्यामुळे त्यांना अटक करणे आवश्यक होते, असे समर्थन सीबीआयने आज सर्वोच्च न्यायालयात केले. या अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेच्या उत्तरात सीबीआयने नवे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. केजरीवाल अबकारी धोरणाची रचना आणि अंमलबजावणीमध्ये गुन्हेगारी कटात सामील होते, असा दावा सीबीआयने केला आहे.
लष्कराचे ड्रोन भरकटून पाकव्याप्त कश्मीरमध्ये
भारतीय लष्कराचे एक ड्रोन आज भरकटल्यामुळे पूंछ जिह्यातील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त कश्मीरमध्ये गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानी सैनिकांनी हे ड्रोन ताब्यात घेतले आहे. भारतीय सैन्याने हॉटलाईनवर संपर्क साधून हे ड्रोन परत देण्याची मागणी केली आहे.
अंडरट्रायल कैद्यांना जामीन मिळणार
एखाद्या गुह्यासाठी तरतूद असलेल्या शिक्षेच्या अर्धी किंवा एकतृतीयांश शिक्षा भोगलेल्या किंवा तितका काळ कोठडीत घालवलेल्या अंडरट्रायल कैद्याला जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023चे कलम 479 हे 1 जुलैपूर्वी दाखल झालेल्या सर्व प्रलंबित प्रकरणांना लागू करण्याची परवानगी आज सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील तुरुंग अधीक्षकांना दिली. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने देशभरातील तुरुंग अधीक्षकांना कलम 479 अन्वये एकतृतीयांश कालावधी पूर्ण केलेल्या कैद्यांच्या अर्जावर कारवाई करण्यास सांगितले.
युवासेनेचे उपसचिव जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या उपसचिव पदी चेतन नाईक, प्रथमेश वराडकर, पायल ठाकूर आणि सोमेश धुरी यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.