बदलापूरमधील उद्रेक ही लोकांमधील अस्वस्थता – शरद पवार

बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर अत्याचारानंतर झालेल्या आंदोलकांमध्ये बदलापूरचे कोणीही नव्हते, बाहेरून आलेले लोक होते, असे मुख्यमंत्री आणि मंत्री सांगत आहेत आणि पोलीस लोकांवर गुन्हे दाखल करत असल्याच्या प्रश्नावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारमधील कोणी असे बोलणे योग्य नाही. ही लोकांमधील अस्वस्थता आहे. भावना व्यक्त करायची लोकांची ती पद्धत असते. यात कोणाला राजकारण करायचे असेल, असे मला वाटत नाही.

पुण्यात मोदी बागेतील निवासस्थानी पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी राज्य सरकारने अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जावरही टीका केली. सत्तेत किंवा सत्तेबरोबर असणाऱ्यांच्या कारखान्यांना मदत केली गेली. राज्य सरकार अडचणीत आलेल्यांना मदत करताना नीती ठरवते. आता नीती ठरली, मात्र मदत फक्त सत्तेत असणाऱ्यांच्या कारखान्यांना केली गेली. यापूर्वी असे कधीही होत नव्हते. सरकारमध्ये मंत्र्यांकडून शपथ घेतली जाते. त्या वेळी मी निर्णय घेताना त्यामध्ये न्याय्य विचार करेन, असे म्हटले जाते.

अडचणीत असलेल्यांना मदत करताना त्यात राजकारण आणले जात असेल तर तो त्या शपथेचा एक प्रकारे भंगच आहे, असे पवार म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण याबद्दल होत असलेल्या चर्चांबद्दल शरद पवार म्हणाले, निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात आमच्या पक्षाला स्वारस्य नाही, सत्ता परिवर्तन होणे हे मला महत्त्वाचे वाटते.