>>अस्मिता प्रदीप येंडे
गेली कित्येक वर्षे आरक्षणाच्या मुद्दय़ावर बरीच चर्चा झाली. आजही आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. मध्यंतरी शासनाने महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक व मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे नियोजन केले. त्यानुसार शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. आपल्या नोकरीव्यतिरिक्त हे कर्मचारी / अधिकारी जनगणना, निवडणुकीची कामेही सक्षमपणे पार पाडतात. लेखक सुनील पांडे हे पुणे महानगरपालिकेत कार्यरत आहेत. मराठा व खुल्या गटाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश निघाले आणि या सर्वेक्षण कार्यात लेखक सुनील पांडे यांना प्रगणक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. एकूण 11 दिवस चाललेल्या या सर्वेक्षण कार्यात शासकीय कर्मचारी म्हणून काम करताना त्यांना चांगल्या-वाईट प्रकारचे जे अनुभव आले, ते त्यांनी ‘तुमची जात कोणती?’ या पुस्तकातून मांडले आहेत. हे पुस्तक म्हणजे सर्वेक्षण करणाऱ्या त्या तमाम कर्मचाऱ्यांचे मनोगतच आहे.
त्या निवडक 11 दिवसांत दिवसभरातील घडलेल्या सर्व घडामोडी लेखक आपल्या डायरीमध्ये नोंद करत होते. त्यामुळे या अनुभवांची मांडणीही त्यांनी रोजनिशीच्या साच्यात अगदी तारखेसहित बसवली आहे. सर्वेक्षण कार्यक्रम सुरू होण्याआधी कोणती पूर्वतयारी आवश्यक आहे, प्रभागानुसार प्रगणक नेमणे, त्यांना प्रशिक्षण देणे, सर्वेक्षणात कोणत्या प्रश्नांचा समावेश करावा, संपूर्ण काम ऑनलाइन स्वरूपात असल्याने ऑनलाइन प्रणाली समजून घेणे, अॅप्लिकेशन डाऊनलोड करणे, सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधणे, ही संपूर्ण प्रक्रिया लेखकाने संयतपणे सांगितली आहे.
या पुस्तकात लेखकाने सर्वेक्षणाच्या वेळी आलेले अनेक अनुभव विशद केले आहेत. आजूबाजूला अनेकांगी विषय वेचण्याची दृष्टी लेखकापाशी आहे. त्यामुळे त्या साध्या प्रसंगांनाही साहित्यरूप देऊ शकले. सर्वेक्षणाची ही साहित्यरूपी डायरी वाचावी अशी आहे.
तुमची जात कोणती?
n लेखक ः सुनील पांडे n प्रकाशक ः स्नेहवर्धन प्रकाशन
n मूल्य ः 200 रुपये