>>रविप्रकाश कुलकर्णी
एकेकाळी पंतप्रधान असलेल्या चंद्रशेखर यांनी ‘जीवन जैसे जियो’ हे आत्मकथन (संपादन- सुरेश शर्मा) लिहिलं. ते 15 एप्रिल 2002 मध्ये प्रकाशित झालं. मराठी वाचकांसाठी हे पुस्तक विशेष महत्त्वाचे आहे असं वाटून जवळ जवळ बावीस वर्षांनी अंबरीश मिश्र यांनी त्याचा अनुवाद केला आहे. आता ते आत्मकथन राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं आहे. या अनुवादाच्या आधी अंबरीश मिश्र यांचं ‘चंद्रशेखर ः समंजस आणि संवेदनशील’ असं एक मोठं प्रकरण आहे. त्यात त्यांनी चंद्रशेखर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला आहे. तसंच पत्रकार म्हणून त्यांच्याशी जो संबंध आला आहे त्या हकीकती रंगतदारपणे दिलेल्या आहेत.
ते लिहितात… ‘चंद्रशेखरांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात प्रजा सोशॅलिस्ट पार्टीतून (पीएसपी) झाली नि पुढे ते काँग्रेस पक्षात गेले. पुढच्या टप्प्यात जनता पार्टी…जनता पक्ष आणि जनता सरकार स्थापनेत त्यांनी बहुमोल भूमिका बजावली. नव्वदचं दशक लागता लागता देशात गठबंधन पर्व सुरू झालं. दिल्लीत तेव्हा बरीच राजकीय गडबड सुरू होती. अशातच चंद्रशेखर काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर देशाचे पंतप्रधान झाले. सत्तापदाच्या आकांक्षाचं त्यांच्या कारकीर्दीतलं हे एकच उदाहरण. काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यामुळे त्यांचं सरकार कोसळलं. सगळेच पक्ष तेव्हा निसरडय़ा वाटेवरून घसरत नि घरंगळत होते.’
अंबरीश मिश्र यांनी यानिमित्ताने त्या वेळच्या राजकारणाचा हिशेब नव्हे, पंचनामा व्यवस्थितपणे केला आहे. त्याचबरोबर चंद्रशेखर यांच्या आत्मकथनाचं मूल्यमापनदेखील. एकच उदाहरण, अंबरीश मिश्र म्हणतात, ‘इंदिराजींना लोकतांत्रिक परंपरा मोडायची नव्हती. सल्लागारांचा चुकीचा सल्ला ऐकून त्यांनी देशावर आणीबाणी लादली, असं चंद्रशेखर म्हणतात हे पटत नाही, पण पुस्तकात एके ठिकाणी चंद्रशेखर म्हणतात, राजकारण सत्यावर चालत नाही हेच खरं.’
हे सांगत असतानाच आजची परिस्थिती काय आहे याबाबत अंबरीश मिश्र म्हणतात, ‘गेल्या सत्तर-पंचाहत्तर वर्षांत आपण करुणा, माणुसकी, मुदिता वगैरे मूल्यांचा चिखल करून टाकलाय. मुळात नेतेच या मूल्यांवर विश्वास ठेवून राजकारण करत नसल्यामुळे नव्या पिढीला तर आता नेत्यांचा उबग आला आहेच नि उच्च मूल्यांचासुद्धा. त्यांना ते सगळं खोटं नि गिळगिळीत वाटतं. या पिढींच्या लेखी सगळं जगणं हे ट्रान्झॅक्शनल आहे. बाकी सगळं ‘फक ऑफ’ आहे.’ अंबरीश मिश्र यांचा पारा चढलेला आहे हे उघडच आहे.
या आत्मकथनात काही ठिकाणी ते खूप काही सांगून जातात. पूर्णवेळ राजकारणात पडायचं, पण त्याच वेळी पोटापाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्यांना वाटतं, आपल्या मित्रासारखंच आपण एक हॉटेल काढावं. पण तो विचार सोडून दिला. असाच दुसरा अनुभव. ‘मग मनात आलं की, लेखक व्हावं. हिंदी चांगलं लिहायचो. लेखक होण्याचे प्रयत्न सुरू केले. एका लेखकाला भेटलो. लिहिण्याचं काही काम मिळेल का? मी त्यांना विचारलं. पण त्याचे विचार ऐकून मी दचकलोच. समाजवादी समाज घडवण्याच्या प्रयत्नात मी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. शोषणाविरुद्ध लढा द्यायचा म्हणतोय नि येथे तर माझंच शोषण सुरू झालंय. थोडक्यात, लेखक होण्याची योजना बारगळली.’
‘मी दाढी दीक्षित कसा झालो?’ खासदार राजाराम शास्त्राrचे इरसाल अनुभव, लोहिया एकदा पोहण्याच्या संदर्भात उदाहरण देत असताना चंद्रशेखर यांनी त्यांना निरुत्तर कसं केल, रामनाथ गोयंका, आणीबाणीतील एकेक इरसाल हकीकती आणि राजनारायण यांच्याबद्दलच्या गोष्टी हे सगळं वाचताना अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो.
‘स्वप्नं खरी ठरतात की काय? हे वास्तव ना मी विसरू शकत ना ते खोटं आहे असं सिद्ध करू शकत. 1 मे 1977 रोजी जनता पक्षाची रीतसर स्थापना झाली. आधी सरकारचा शपथविधी आणि नंतर पक्षाचा जन्म हे बहुधा लोकशाहीच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण. गरिबीचा अनुभव नसताना गरीबांसाठी कोणी काही केल्याचं एकही उदाहरण इतिहासात सापडणार नाही. आज आमच्या समोरही हाच प्रश्न आहे.’ अशासारखे चंद्रशेखर यांचे विचार दिशादर्शक ठरावेत.