Shakib Al Hasan – बांगलादेशचा ऑलराउंडर क्रिकेटपटू अडकला, हत्येचा गुन्हा दाखल

बांगलादेश क्रिकेट संघाचा अष्टपैलु खेळाडू आणि स्टार क्रिकेटर शाकिब अल हसनच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ढाका येथील अदबोर पोलीस स्टेशनमध्ये शाकिबच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ढाका ट्रिब्युन या बांगलादेशी न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी एडबोर येथील रिंग रोडवर निषेध मोर्चात रुबेल हा इसम सामील झाला होता. मोर्चा दरम्यान झालेल्या गोळिबारात रुबेलच्या छातीमध्ये आणि पोटामध्ये गोळी लागली होती. त्याला रुग्णालयात दाखल केले असता 7 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मयत रुबेलचे वडील रफीकुल इस्लाम यांनी ढाका येथील अदबोर पोलीस स्टेशनमध्ये शाकिब अल हसन विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमदवर सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या वर्षी जानेवारीमध्ये अवामी लीगच्या तिकिटावर शाकिब अल हसन आणि फिरदौस अहमद खासदार म्हणून निवडून आले होते. परंतु, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातून पलायन केल्यामुळे दोघांनाही खासदारकी गमवावी लागली. याच पार्श्वभुमीमुळे शाकिब अल हसन आणि फिरदौस अहमदवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर माजी पंतप्रधान शेख हसीना, ओबेदुल कादर आणि अन्य 154 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये जवळपास 400 ते 500 अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे.