चंद्रपूर जिह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. पदाधिकाऱयांची बैठक आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाहेर पडताच कार्यकर्ते आपसात भिडल्याने चांगलीच खळबळ उडाली.
राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱयावर असून ते गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर आदी जिह्यांना भेटी देत आहेत. राज ठाकरे यांनी विदर्भात मनसेचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ते स्वतः चाचपणीसाठी विदर्भात आले आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांसोबतच चर्चा, बैठका, मेळावे घेऊन ते राजकीय परिस्थिती जाणून घेत आहेत. यामध्ये त्यांनी गुरुवारी रात्री चंद्रपूर जिह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक बोलावली होती. यावेळी राजुरा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून बैठकीत वाद निर्माण झाला.