लोकसभा निवडणुकीमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता महाविकास आघाडीने विधानसभेवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीला एखादा चेहरा देऊन सामोरे जावे असे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. चेहरा असल्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाता येत नाही. याबाबत महाविकास आघाडीत चर्चाही झाली आहे. निवडणुकीला सामोरे जाताना एखादा चेहरा समोर आणावा. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे धोरण कधीच यशस्वी होत नाही. आघाडीतील प्रत्येक पक्ष एकमेकांच्या जागा पाडतो. आम्ही भाजपसोबत हा अनुभव घेतलेला आहे, असे स्पष्ट मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
यावेळी संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समाचार घेतला. बावनकुळे राजकारणातील वाया गेलेली केस असून लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कामठी मतदारसंगात भाजप 30 हजार मतांनी मागे होता. तेव्हापासून त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी आम्हाला कोणाकडे याचना करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांनीही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने उमेदवार द्यावा मी पाठींबा देईल असे स्पष्ट म्हटले आहे. त्यांनी स्वत:विषयी कुठेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे बावनकुळे यांना ऐकू येत नसेल तर त्यांनी कानाचे ऑपरेशन करून घ्यावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
बदलापूरमध्ये झालेल्या दृष्कृत्याविरोधात महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून हा बंद 100 टक्के यशस्वी होईल असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. अंमली पदार्थ, तरुणींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार याप्रकरणी कायद्याचे रक्षण करण्यासाठी पोलिसांना फ्री हँड दिला असता तर बंद करण्याची वेळ विरोधकांवर आली नसती, असेही ते म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत गेलेले गद्दार परत आमदार होणार नाहीत. लोकांनी ठरवले आहे की त्यांना परत निवडून आणायचे नाही, असेही यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले. जळगावमधील आमदारानेही निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
राज्यातील पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटलेलं; खाकी वर्दीत निर्जीव लोक! संजय राऊत यांचा संताप
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 25 तारखेला जळगावमध्ये सभा आहे. या सभेत कांदाप्रश्न, शेतकरी आत्महत्या या विषयावर ते भाष्य करतील का असे विचारले असता राऊत म्हणाले की, त्यांच्यासमोर सध्या मोठे प्रश्न आहेत. ते पोलंडमध्ये असून युद्धावर भाष्य करत आहेत. तिथून ते युक्रेनच्या युद्धभूमीवर जातील. त्याआधी त्यांनी रशियात जाऊन पुतीनसोबत चहाही प्यायला. त्यामुळे शेतकरी, महिला प्रश्न, कांदा, दूध प्रश्न याविषयी त्यांना विचारू नका. ते विश्वगुरू आहेत. विश्वगुरुला गावातील प्रश्न विचारायचे नसतात. लहानसहान प्रश्न विचारले की त्यांची तपस्या भंग होते, असा टोला राऊत यांनी लगावला.