अफगाणिस्तान क्रिकेट संघाने टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रामकृष्णन श्रीधर यांचा समावेश आपल्या कोचिंग स्टाफमध्ये केला आहे. मात्र अफगाणिस्तानने आर श्रीधर यांचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नव्हे तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून समावेश केला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून रामकृष्णन श्रीधर यांचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्याबाबत माहिती दिली आहे. अफगाणिस्तानचा संघ हिंदुस्थान दौऱयावर नोएडात न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिकाही खेळणार आहे. आर. श्रीधर या दोन्ही मालिकेत सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत. याआधी अफगाणिस्तानने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी हिंदुस्थानचा माजी दिग्गज खेळाडू अजय जडेजाला मार्गदर्शक म्हणून समाविष्ट केले होते.