वाढवण बंदराला पालघरवासीयांचा कडाडून विरोध असतानाही केंद्र सरकारने हे बंदर तयार करण्याचा घाट घातला आहे. येत्या 30 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंदराच्या भूमिपूजनासाठी येणार आहेत. या भूमिपूजन सोहळ्य़ाचा केंद्र सरकारची अंत्ययात्रा काढून विरोध करण्याचा निर्णय भूमिपुत्रांनी पालघर येथे झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीला वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे आणि विविध मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी स्थानिक भूमिपुत्रांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
वाढवण बंदराला पालघर जिह्यातील मच्छीमारांसह बागायतदार व इतर नागरिकांचाही विरोध आहे. तरी सरकारने या बंदराच्या भूमिपूजनाचा घाट घातला आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती व आदिवासी संघटना, युवा संघटना, पदाधिकाऱ्यांची बैठक आज पालघर येथे पार पडली. या बैठकीत वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या दिवशी पालघर जिह्यातील सर्व मच्छीमारांसह बागायतदार व इतर सर्व नागरिक वरोर येथे मोठा जनसमुदाय जमा करून तेथून वाढवण बंदरापर्यंत प्रेतयात्रा काढून या कार्यक्रमाचा निषेध व्यक्त केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर 25 ऑगस्ट रोजी डहाणू येथे महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीत या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला कशा प्रकारे विरोध करायचा याची घोषणा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाबाबत कमालीची गुप्तता
30 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये येणार असून त्या दिवशी वाढवण बंदराचे भूमिपूजन आयोजित केला आहे. त्याची तयारी मात्र पालघरमध्ये सुरू आहे. सदरचा कार्यक्रम वाढवण येथे न होता तो पालघरमध्ये होणार असून इथूनच भूमिपूजन केले जाणार असल्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच असलेल्या सिडको मैदानावर जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.