देशात रोज बलात्काराच्या 90 घटना; कठोर कायदा करा, ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधानांना पत्र

देशात रोज बलात्काराच्या 90 घटना घडत आहेत. हे अत्यंत भयंकर असून बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा करायला हवा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. बलात्काराच्या घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालवून सुनावणी 15 दिवसांत पूर्ण व्हायला हवी, असेही ममता बॅनर्जी यांनी पत्रात नमूद केले आहे.

कोलकात्यातील आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शने होत आहेत. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आता पंतप्रधानांना पत्र लिहून या विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले आहे.

विशेष न्यायालये स्थापन करा!

महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी बलात्काराच्या, हत्येच्या घटना थांबवणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. अशा संवेदनशील मुद्दय़ांवर केंद्रीय कायद्याच्या माध्यमातून लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. अशी प्रकरणे फास्ट ट्रक न्यायालयात चालवण्यासाठी विशेष न्यायालयेदेखील स्थापन करण्याचा विचार व्हायला हवा, असे ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे.