‘लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरात असतानाच एका दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर येथे ही घटना घडली. ही मुलगी काल बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती. तिचा परिसरात शोध घेऊनही ती न सापडल्याने रात्री कुटुंबीयांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या साह्याने शिये रामनगर परिसरातील सीसीटीव्ही पॅमेरे आणि शेतातील विहिरी, ओढे, ऊसाच्या फडातही शोध घेतला. पहाटे चार वाजेपर्यंत शोध सुरू होता. मात्र काहीच सुगावा लागत नसल्याने श्वान पथक आणण्यात आले. त्यानंतर काही वेळातच घरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर उसाच्या फडात या मुलीचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.