हिंदुस्थानच्या रौनक दहियाने जॉर्डनच्या अम्मान येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत देशाला पहिले पदक जिंकून दिले. त्याने ग्रीको-रोमनच्या 110 किलो गटात कांस्यपदकाची कमाई करीत हिंदुस्थानचे खाते उघडले.
युवा कुस्तीपटू रौनकने कांस्यपदकाच्या लढतीत तुकाaच्या इमरुल्ला पॅपकनला 6-1 गुणफरकाने लोळविले. तत्पूर्वीच्या उपांत्य लढतीत रौनकला हंगेरीच्या झोल्टन जाकोकडून 0-2 फरकाने पराभव पत्करावा लागला होता. या प्रकारातील सुवर्णपदक युव्रेनच्या इव्हान यांकोव्स्की याने पटकावले. त्याने अंतिम लढतीत झोल्टन जॅकोचा 13-4 असा पराभव केला.
साईनाथकडून कांस्यपदकाची आशा
साईनाथ पारधी हा हिंदुस्थानचा आणखी एक ग्रीको-रोमन कुस्तीपटू आहे. तोदेखील कांस्यपदकाच्या शर्यतीत असून त्याकडूनही देशवासीयांना पदकाची आशा आहे. 51 किलो वजनी गटात रिपेचेज फेरीत त्याची पहिली कुस्ती अमेरिकेच्या मुन्नारेटो डोमिनिक मायकलशी होईल. जर त्याने मुनारेटोला पराभूत केले तर कांस्यपदकासाठी त्याला आर्मेनियाचा सार्गिस हारुत्युन्यान आणि जॉर्जियाचा युरी चॅपिडझे यांच्यातील विजेत्या कुस्तीपटूशी सामना करावा लागेल.
रौनक दहियाचा चॅम्पियनशिपमधील प्रवास
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या रौनक दहियाने आपल्या चॅम्पियनशिप मोहिमेची सुरुवात आर्टूर मानवेलयानवर 8-1 असा विजय मिळवून केली. यानंतर रौनकने दुसऱ्या लढतीत डॅनियल मास्लाकोवर तांत्रिक श्रेष्ठतेने विजय मिळवला, मात्र उपांत्य फेरीचा सामना गमावल्यामुळे तो सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला. मात्र त्याने रेपेचेज फेरीत कांस्यपदकाच्या लढतीत सर्वस्व पणाला लावत बाजी मारली.