>> वैश्विक, [email protected]
‘चकाके कोर चंद्राची’ असे एक गाणे गंगूबाई हनगल आणि जी. एम. जोशी यांच्या स्वरात 1930 च्या दशकात ध्वनिमुद्रित झालं होतं. त्यानंतर चंद्रकोरीचं वर्णन करणारी अनेक स्वप्नील गाणी आली. अमावस्या ते पौर्णिमा या पंधरवडय़ात वाढत जाणारा आणि पौर्णिमा ते अमावस्या या पंधरवडय़ात क्षीण होणारा चंद्र आपणही कायम पाहत असतो. त्याच्या कोरी किंवा कला (फेजिस) या पृथ्वी-चंद्राच्या परिभ्रमणाशी निगडित असल्यामुळे कोणत्या रात्री चंद्रावरचा सूर्यामुळे प्रकाशित झालेला भाग आपल्याला दिसेल हे नुसत्या निरीक्षणानेही समजते. आपली सगळी हिंदुस्थानी कॅलेंडर अमावस्या आणि पौर्णिमेशी निगडित आहेत.
चंद्राप्रमाणेच आपला शेजारी आंतरग्रह असलेला शुक्र ग्रहाच्या कला दुर्बिणीतून स्पष्ट दिसतात. अर्थात त्यासाठी किमान 8 इंच व्यासाच्या आरशाची दुर्बीण हवी. आकाश दर्शनाच्या गेल्या चार दशकांच्या कार्यक्रमात आम्ही अनेक वेळा अशा शुक्र कला पाहिल्या आहेत. शुक्राच्या अष्टमीनंतर त्याचा वाढत जाणारा प्रकाशित (गिब्बस) भाग पाहताना तर (दाट काळोख असलेल्या आकाशाखाली उभे राहून) शुक्राचं चांदणं आपल्या चेहऱ्यावरही प्रतिबिंबित कसं होतं याचा छान अनुभव घेतलाय. शुक्र ‘तारा’ नसतो, तो एक तेजस्वी ग्रह आहे. या तेजामुळेच त्याला ‘शुक्र’ असे नाव आपल्या प्राचीन खगोल अभ्यासकांनी दिले. शुक्राचं तेजस्वी दिसणं, तो आकाराने गुरू ग्रहापेक्षा लहान असूनही अधिक का दिसतो याचे एक कारण म्हणजे शुक्र पृथ्वीला तुलनेने गुरूपेक्षा खूपच जवळ आहे. शुक्र आणि पृथ्वीमधले अंतर सुमारे पाच कोटी किलोमीटर आणि सूर्यापर्यंतचे त्याचे अंतर 10 कोटी किलोमीटर आहे. तो स्वतःभोवती 243 दिवसांत आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो व त्याचा अक्ष 177 अंशात कललेला असल्याने तिथे ‘सूर्योदय’ पश्चिमेला आणि सूर्यास्त पूर्वेला होतो. हे शुक्राचे मोठेच वैशिष्टय़ आहे.
सेकंदाला 35 किलोमीटर वेगाने सूर्याभोवती फिरणारा शुक्र वेगात 224 दिवसांत फेरी पूर्ण करतो. परिणामी त्याचा दिवस त्याच्या वर्षापेक्षा मोठा असतो. याशिवाय त्याच्या अवकाशात सल्फर आणि कार्बनचे ढग असल्याने त्यावरूनच सूर्यप्रकाश 59 टक्के परावर्तित होतो. पृथ्वीवरून 31, तर चंद्रपृष्ठावरून 11 एवढा असतो. मात्र चंद्र खूप जवळ असल्याने पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आपली रात्र उजळू शकतो.
शुक्र ग्रह सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असतो तेव्हा त्याची कलेकलेने वाढत जाणारी कोर दिसू शकते अर्थात दुर्बिणीतून. बुध आणि शुक्र हे दोन्ही आंतरग्रह त्यांच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमण कक्षेत पृथ्वी-सूर्याच्या मध्ये आले की, त्यांचे सूर्यबिंबावरून सरकत जाणाऱ्या काळय़ा ठिपक्यासारखं अतिक्रमण किंवा ‘ट्रान्झिट’ दिसतं. यातही तेजस्वी शुक्र बुधापेक्षा आकाराने मोठा असल्याने त्याचा ठिपका बुधाच्या तुलनेत ठळक दिसतो. शुक्राचे असे ट्रान्झिट आपल्याला एका शहरातून 112 वर्षांनी पाहायला मिळते. त्यानंतर लगेच 8 वर्षांनी दिसते. ही दोन्ही अधिकपणे आम्ही 8 जून 2004 आणि 6 जून 2012 या दिवशी पाहिली. आता अशी शुक्र अधिक्रमणाची घटना 10 डिसेंबर 2117 आणि 8 डिसेंबर 2125 रोजी दिसेल. तोपर्यंत धीर धरायला हवा आणि पुढच्या पिढय़ांपर्यंत तो संदेश पोहोचवून एका अद्वितीय संधीची आठवण ठेवायला हवी.
शुक्र ग्रह सूर्य व पृथ्वीच्या मधूनच फिरतो. पण ज्या वेळी तो पृथ्वीला जास्त जवळ असतो, त्या वेळी त्याची सुंदर कोर दिसते. शुक्र सूर्यापलीकडे परिभ्रमण कक्षेत जातो तेव्हा त्याच्या पौर्णिमेचे दर्शन आपल्याला होऊ शकते. त्याची अमावस्या म्हणजेच अधिक्रमण या गोष्टी थेट निरीक्षणातून चांगल्या लक्षात राहतात. शुक्र त्याच्या बारीक कोरीपासून पूर्ण शुक्र होण्याचा (म्हणजे आपल्याला तसा दिसल्याचा) काळ सुमारे 594 दिवसांचा असतो. पृथ्वीवरून बारकाईने निरीक्षण करत असताना अभ्यासकांना त्याच्या आकारात किंचित बदल जाणवतो. आपल्यापासून 6.5 कोटी किलोमीटरवर असलेला शुक्र अधिकाधिक -4.5 (उणे 4.5) प्रतीच्या तेजस्वीतेचा दिसतो. व्याध ताऱ्याची प्रत या मापनासाठी योग्य समजली जाते. त्यावरून इतर ग्रह ताऱ्यांच्या दृश्य प्रतींचे मोजमाप होते. यामध्ये उणे प्रत म्हणजे जास्त तेजस्वी आणि व्याध ताऱ्याच्या तुलनेत अधिक प्रत म्हणजे कमी तेजस्वी असे मानले जाते. शुक्र जेव्हा चमकदार दिसतो तेव्हा तो 28 टक्के प्रकाशात असतो.
1610 मध्ये गॅलिलिओ यांनी दुर्बिणीतून शुक्रदर्शन घेतले. शुक्रावर रोखलेली ती पहिलीच दुर्बीण असावी. त्याबद्दल दुमत मात्र आहे. केपलर या संशोधकाला लिहिलेल्या पत्रात गॅलिलिओ यांनी आपण शुक्र कला पाहिल्याचे कालांतराने नमूद केले होते. शुक्रावरचे प्रचंड कार्बन, तसेच सल्फरच्या दाट वातावरणामुळे त्याच्या पृष्ठभागावर वसाहत करणे शक्य नाही. शिवाय शुक्रपृष्ठावर उभे राहिले तर बशीमध्ये उभे राहिल्यागत वाटेल. कारण सभोवतालचे गोलाकार क्षितिज किंचित वर उचलल्यासारखे दिसेल. अशी ही शुक्रगाथा. त्याच्या चमकण्याची आणि त्याच्या कलांसह अनेक वैशिष्टय़ांची. नोव्हेंबरपासून शुक्र सायंकाळी दुर्बिणीतून जरूर पाहा. एक वैज्ञानिक आनंद मिळेल.