>> प्रसाद नायगावकर
बाप लेक बैलगाडीने तलावाजवळ असलेल्या शेतात जात असताना बैलगाडीसमोर अचानक आलेल्या रानडुकरांच्या कळपामुळे बैलजोडी बिथरली आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बैलगाडी सरळ तलावात पडली. तलावात बैलगाडी अंगावर पडल्याने आणि तलावाबाहेर न पडू शकल्याने तलावात बुडून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमोल देविदास चव्हाण (वय 35 )आणि वीरू अमोल चव्हाण (वय 11 ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या बाप-लेकाचे नाव आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मेट येथील रहिवासी अमोल चव्हाण यांचे शेत तळ्याजवळ आहे. शेतात काम करण्यासाठी दोन्ही बापलेक बैलगाडीने जात होते. बैलगाडीसमोर अचानक रान डुकरांचा कळप आल्याने बैल बिथरले. त्यामुळे ते पळत सुटले आणि बैलगाडी तलावात पडली. त्यामुळे तलावात दोघे बापलेक बुडाले. त्यांच्या अंगावरच बैलगाडी पडल्याने गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना तलावाजवळील माळरानावर जात असलेल्या युवराज उत्तम राठोड यांनी पाहिली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्या ठिकाणी शिवारातील काही व्यक्ती धावत आले. त्यांनी तलावात जाऊन दोघांना बाहेर काढले परंतु तोपर्यंत बापलेकांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती माजी जि. प. सदस्य उत्तमराव राठोड यांनी पोलीस ठाण्यात व तलाठी यांना कळवल्यानंतर बिटरगाव पोस्टचे ठाणेदार प्रेम कुमार केदार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले .या अचानक घडलेल्या घटनेमुळे मेट गावात व परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात होती .