अन्यथा युवकांची नाराजी सरकारला परडवडण्यासारखी नाही, कैलास पाटील यांचा सरकारला इशारा

येत्या रविवारी 25 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकला व याच परिक्षेत कृषी विभागातील 258 राजपत्रित जागा समाविष्ट करण्यात याव्या याकरीता स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र या परिक्षेमध्ये कृषिसेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याचे लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाविरोधात मंगळवारी रात्री पासून पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी ‘रास्ता रोको’ आंदोलन करीत आहेत. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सरकारने विद्यार्थी हिताला प्राध्यान्य द्यावे… अन्यथा युवकांची नाराजी सरकारला परवडण्यासारखी नाही, असा इशारा दिला आहे.

“25 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकला व याच परीक्षेत कृषी विभागातील 258 राजपत्रित जागा समाविष्ट कराव्यात यासाठी काल रात्री पासून पुणे येथे अनेक विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. आयोगाने मागच्या वर्षी राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा याची परीक्षा योजना प्रसिद्ध केली होती.. त्यामध्ये एकूण नऊ प्रवर्गाचा समावेश होता. त्यात कृषी विभागातील सर्व राजपत्रित पदांचा देखील समावेश केला होता.. याचा अर्थ या परीक्षा योजनेमध्ये समाविष्ट सर्व नऊ संवर्गाची पदे याच एका पूर्व परिक्षेमधून भरली गेली पाहिजेत हे आयोगाने त्यांच्या परीक्षा योजनेमध्ये सांगितले आहे.. परंतु आयोगाने काल पत्र काढून कृषी विभागातील परीक्षा ऑक्टोंबर मध्ये घेण्याचे जाहीर केले आहे.. ही गोष्ट आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा परीक्षा योजनेच्या विरुद्ध आहे.. यातून आयोगाने त्यांच्याच योजनेला हरताळ दिलेला आहे. आयबीपीएस आणि एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा 25 ऑगस्ट रोजी असल्याने अनेक विद्यार्थांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.. त्यामुळे आयोगाने त्यांच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलून ऑक्टोबर मध्ये घ्यावी आणि यातच कृषी सेवेच्या पदांचा समावेश करावा, अशी विद्यार्थांची मागणी आहे. राज्य सरकारने या विद्यार्थांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निर्देश द्यावेत आणि त्या संदर्भातील परिपत्रक जाहीर करून विद्यार्थी हिताला प्राधान्य द्यावे. अन्यथा युवकांची नाराजी सरकारला परवडण्यासारखी नाही” असे ट्विट कैलास पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र कृषिसेवा गट ‘अ’ व गट ‘ब’ संवर्गांतील एकूण 258 पदांचे मागणीपत्र आयोगास 16 ऑगस्ट रोजी शासनाकडून प्राप्त झाले आहे. लोकसेवा आयोगाच्या 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा नियोजनानुसार महाराष्ट्र कृषिसेवेतील पदे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेतून भरण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. तथापि, या परीक्षेसंदर्भात 29 डिसेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे महाराष्ट्र कृषिसेवा परीक्षा – 2024 साठी मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने या कृषिसेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.