मासेमारी नौकेवर चहा बनवताना स्टोव्हचा भडका झाला. भडक्यामुळे अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्याने नौकेवरील एक जण गंभीर भाजला. जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. संजय महादेव पाटील असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आडिवरे डोंगरवाडी येथील रहिवासी संजय पाटील हे 10 ऑगस्ट रोजी नौका घेऊन मासेमारीसाठी गेले होते. सकाळी 10 च्या सुमारास नौकेवर चहा बनवत असताना स्टोव्हचा अचानक भडका उडाला. आगीच्या भडक्यात पाटील यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. यामुळे पाटील गंभीर भाजले. त्यांना देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
दामोदर नाटेकर यांच्या फिर्यादीवरुन देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव करीत आहेत.