हॉर्न वाजवल्याचा राग; रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला

रस्त्याच्या मधून चालणाऱ्या पादचाऱ्याला हॉर्न दिल्याने रिक्षाचालकाच्या डोक्यात त्याने दगड घातल्याची घटना ठाकुर्लीत घडली आहे. लक्ष्मण चौधरी असे जखमी रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ठाकुर्लीतील विसर्जन तलाव भागातील एका सोसायटीत लक्ष्मण चौधरी कुटुंबासह राहतात. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ते प्रवासी घेऊन जात होते. काही जण रस्त्याच्या मध्यभागातून चालत होते. त्यांना बाजूला करण्यासाठी रिक्षाचालकाने हॉर्न वाजवला. याचा प्रवाशाला राग आला. त्याने हॉर्न का वाजवला असे लक्ष्मण यांना विचारले. रिक्षाचा धक्का लागला असता म्हणून भोंगा वाजवला असे सांगितले. याचा राग आल्याने पादचाऱ्याने रस्त्याच्या कडेला असलेला दगड उचलून रिक्षाचालकाच्या डोक्यात घातला. त्यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिकेत चौधरी याच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर काते करत आहेत.