काळा घोडा परिसर शनिवार, रविवार आता पादचारी झोन, आदित्य ठाकरे यांची संकल्पना प्रत्यक्षात

दक्षिण मुंबईतील पर्यटकांचे आकर्षण असणारा काळा घोडा परिसर आता वीकेंडला शनिवार आणि रविवार सायंकाळी ‘पादचारी झोन’ म्हणून वापरला जाणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. सप्टेंबरपासून याची अंमलबाजावणी होईल. ही अभिनव संकल्पना तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. ती आता प्रत्यक्षात येत असल्यामुळे समाधान वाटत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी एक्सवर म्हटले आहे.

मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये काळा घोडा परिसरात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे हा भाग मुंबईतील पहिलाच ‘वाहनमुक्त पादचारी झोन’ ठरणार आहे. काळा घोडा परिसर हा मुंबईचा कला परिसर आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी आर्ट आणि इलियाहू सिनेगॉग आहे. दरवर्षी या ठिकाणी होणारा ‘काळा घोडा’ कला महोत्सव जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या भागात आता ‘पादचारी झोन’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. या भागातील वास्तू, रस्ते जवळून न्याहाळता यावेत, त्यांचा अनुभव घेता यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

असा राबवणार उपक्रम

वाहनमुक्त क्षेत्र ही संकल्पना नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद आणि व्हिझिटर्स यांना या संकल्पनेची ओळख करून देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाईल. यासाठी नवीन फुटपाथ, पेंटिंग्ज आणि बेंचसह जागा निश्चित करण्यात येतील.

या ठिकाणी लोक आराम करू शकतील आणि जवळपासच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवून जेवणाचा आनंद घेऊ शकतील. व्हिझिटर्ससाठी पुरेशी पार्किंगची जागादेखील पुरवली जाईल. योजनेत सुधारणेसाठी अभिप्राय विचारात घेतले जातील.

उपक्रमासाठी पाच रस्त्यांची निवड

फोर्ब्स स्ट्रीट, रोप वॉक लेन, साईबाबा रोड, रदरफिल्ड स्ट्रीट आणि बी भरुचा रस्ता हे पाच अंतर्गत रस्ते या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये कोबल्ड पाथवे, वॉल पेंटिंग आणि रस्त्यावरील कलापृती असतील. येथे आधीच कॅफे आणि रेस्टॉरंट्स आहेत. या माध्यमातून या ठिकाणाचा सांस्कृतिक आणि इतिहास समृद्ध करण्यास चालना मिळणार आहे.