Yavatmal News – सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबतच नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे येणारी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यातील नेर तालुक्यात बाणगावमधील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. सुधाकर हिरासिंग चव्हाण असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटाला कंटाळला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे सतत शेतीचे नुकसान होत आहे. सुधाकरवर स्टेट बँकेचे आणि काही खाजगी कर्ज होते. मात्र सततच्या नापिकीपणामुळे कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न सुधाकरसमोर होता.

अखेर याच तणावातून त्याने जीवनयात्रा संपवली. सुधाकरच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत. सुधाकरच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूनंतरही सुधाकरच्या यातना संपल्या नाहीत. बाणगाव येथे स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावर सुधाकरवर अंत्यसंस्कार करावे लागले. पाऊस आल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घ्यावा लागला.