दबावाखालीही अचूक नेम धरतो तोच पदक जिंकतो! उद्धव ठाकरे यांनी केला ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचा गौरव

महाराष्ट्राला तुझा अभिमान आहे अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत हिंदुस्थानला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्या पराक्रमाचा गौरव केला. दबावाखालीही अचूक नेम धरतो, तोच पदक जिंकतो, असे नमूद करत भविष्यातील उज्ज्वल कामगिरीसाठी उद्धव ठाकरे यांनी स्वप्नीलला शुभेच्छा दिल्या.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या वतीने स्वप्नीलचा आज सत्कार करण्यात आला. ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलने अंतिम फेरीत बाजी मारली तेक्हा आपण महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे अशोक पंडित यांना फोन करून स्वप्नीलचा नंबर मागितला होता. नंबर डायल करत होतो, पण लगेच मनात विचार आला की नको, उद्या पेपरला बातमी यायची, निशाणा धरला, उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि नेम चुकला. त्यामुळे मी स्वप्नीलला फोन केला नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

जगातील लोक बघायला येतील असा रायफल रेंज बनवू

मुंबईत आपल्याला असा रायफल रेंज बनवायचा आहे जो बघण्यासाठी जगातील लोकं येतील. सर्व सोयीसुविधांनी युक्त असा तो रेंज असेल, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी असोसिएशनला दिले.

प्रचंड दबावातही अचूक वेध घेऊन जिंकणे महत्त्वाचे

सर्कच पदके महत्त्वाची असतात, पण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्या पदकाला एक वेगळा मान असतो. आपण टीव्हीवर पाहत असतो, मेडलचे महत्त्व मी टेनिसच्या वेळेला पाहिले. ऑलिम्पिक जिंकल्यानंतर जोकोविचची भावना वेगळी होती. एकदा मी विचार केला, आपण ऑलिम्पिकला गेलोय, हातात बंदूक आहे, पण तिथले वाताकरण, देशाचे प्रतिनिधीत्त्व आपण करतोय, या सर्व दबावाखाली अचूक नेम धरून पदक जिंकणे हे खूप महत्त्वाचे असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आईवडिलांना, देशाला विसरत नाही तोच कीर्तीची शिखरे पार करतो

स्वप्नील याच्या बाबांना फोन करून आपण त्यांचे अभिनंदन केले होते असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बाबा अतिशय भारावून बोलत होते. स्वप्नील जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी घरी फोन करून चौकशी करतो. जेवायला काय बनवलेय असेही विचारतो असे त्यांनी त्यावेळी सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कितीही मोठे झालो तरी जो आपल्या आई-वडिलांना, देशाला विसरत नाही तोच कीर्तीची सर्व शिखरे पादाक्रांत करतो, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी स्वप्नीलला उद्देशून व्यक्त केल्या.

रायफल संघटनेकडून कुसाळेला पाच लाखांचा पुरस्कार

तब्बल 72 वर्षांचा महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळेचा महाराष्ट्र रायफल संघटनेच्या वतीने पाच लाखांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. 1952 साली खाशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या एकाही खेळाडू ऑलिम्पिक पदक जिंकण्यात यश लाभले नव्हते. अखेर नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल प्रकारात स्वप्नीलने कांस्यपदकाची कमाई करून इतिहास रचला होता. महाराष्ट्रात नेमबाजांची खाण असली तरी राज्याच्या एकाही दिग्गज नेमबाजाला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नव्हते. तो करिश्मा स्वप्नीलने करून दाखवला. त्याच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान जगात उंचावली होती. त्यामुळे आज राज्य संघटनेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्वप्नीलच्या कामगिरीचे जाहीर कौतुक करण्यात आले आणि त्याला पाच लाखांचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला. याप्रसंगी  दीपाली जगताप, सुमा शिरूर, रौनक पंडित, संघटनेचे अध्यक्ष अशोक पंडित यांच्यासह अनेक दिग्गज नेमबाज या कौतुक सोहळ्याला हजर होते.