माहीममध्ये पोलिसांची घरे फोडली

माहीम पोलीस वसाहतीमध्ये चोरट्याने पोलिसांची घरे फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्याने चांदीच्या वस्तू आणि पैसे घेऊन पळ काढला आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे माहीम पोलीस वसाहतीमध्ये मिळकत व्यवस्थापक म्हणून काम करतात. वसाहतीमध्ये खाली होणाऱ्या खोल्यांची आणि नवीन रूमची माहिती शासनाला कळवण्याचे ते काम करतात. त्याच्या मदतीला दोन महिला शिपाईदेखील आहेत.

दोन दिवसांपूर्वी ते पाण्याच्या टाक्या भरल्या की नाहीत हे पाहून घरी गेले. दुसऱ्या दिवशी ते कामावर आले तेव्हा चोरी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ते वसाहत क्रमांक 4 अ येथे गेले. तेथे राहणाऱ्या एक महिला या ड्युटीवर होत्या तेव्हा त्यांच्या घराची कडी तोडली गेली. त्या इमारतीमधील चार घरांत साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. या घटनेनंतर ते दुसऱ्या इमारतीमध्ये गेले. चार घरांत साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तक्रारदार हे 1 अ, 2 बी, 17 बी येथे गेले. 17 बी येथे राहणाऱ्या एका पोलिसाच्या घरातून चोरट्याने चांदीचे साहित्य चोरले. तसेच 16 बी आणि इमारत क्रमांक 19 येथील प्ले स्कूलमधील कडी कोयंडे उचकटून चोरट्याने घरे साफ केली.