अदानीचे दलाल येतील, खोके सरकारचे दलाल येतील, पण विकले जाऊ नका, बुलडोझर आले तर उलथवून टाका.
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मिंधे सरकारला संपूर्ण मुंबई उद्योगपती अदानींच्या घशात घालू देणार नाही. धारावीचा पुनर्विकास धारावीकरांच्या डोळ्यादेखतच झाला पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज कडाडले. धारावीकरांच्या हक्काच्या घरासाठी, इथल्या इंच न् इंच जागेसाठी शिवसेना खांद्याला खांदा लावून लढेल, असे आश्वासन देतानाच, धारावी आणि मुंबईचे रक्षण करूया, असा निर्धार त्यांनी यावेळी असंख्य धारावीकरांच्या साक्षीने केला.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज धारावी येथे मुंबई रक्षण सभेचे आयोजन करण्यात आले होते. धारावी पुनर्विकासाबाबत विविध प्रश्न आणि मागण्या या सभेत मांडण्यात आल्या. आदित्य ठाकरे यांनी या सभेत मार्गदर्शन करताना मिंधे सरकार आणि अदानी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई मोडून गुजरातकडे नेता येत नाही म्हणून ती धारावीच्या माध्यमातून अदानींना आंदण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. धारावीच्या बदल्यात 20 भूखंड अदानींना फुकटात दिले जात आहेत. धारावीकरांऐवजी अदानींचाच विकास होत आहे, असे टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी डागले.
तोडा, फोडा आणि राज्य करा असे धोरण ठेवून ईस्ट इंडिया कंपनी देशाला लुटायला निघाली होती. तेच धोरण मिंधे सरकार धारावीमध्ये राबवत आहे. माहीम नेचर पार्क कांदळवने बिल्डरच्या घशात गेली नाही पाहिजे अशी महाविकास आघाडी सरकारची भूमिका होती. मात्र त्या जागाही धारावी पुनर्विकासात मिंधे सरकारने टेंडरमध्ये घेतल्या आहेत याकडे आदित्य ठाकरे यांनी यावेळी लक्ष वेधले. अदानीचे दलाल येतील, खोके सरकारचे दलाल येतील, पण विकले जाऊ नका, बुलडोझर आले तर उलथवून टाका, असे आवाहन त्यांनी केले.
या सभेला खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाबूराव माने आदी नेते मंडळी उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावर मिलिंद रानडे, माजी महापौर श्रद्धा जाधव, महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी, शिवसेनेचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
मुंबादेवीतही मिंध्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही
मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवी मंदिरामागे असलेले शाळेचे आरक्षण बदलून तिथे सुशोभिकरणाच्या नावाखाली 17 मजली कार पार्किंग उभारले जाणार आहे. नागपूरच्या कंत्राटदाराला ते काम दिलेय. पिढय़ान्पिढय़ा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना त्यासाठी हटवले जाणार आहे. या कार पार्किंगमुळे मुंबादेवी मंदिर झाकले जाणार आहे. मंदिराच्या सुरक्षेचा धोका निर्माण होणार आहे. सरकारचे ते मनसुबे शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला.
हिंमत असेल तर लाडक्या बहिणींना आतापासूनच वाढीव रक्कम द्या
लाडकी बहीण योजनेतील रकमेत पुढे वाढ होत जाईल असे आमिष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दाखवले होते. त्याचा दाखला देत आदित्य ठाकरे यांनी यावेळी टीका केली. 15 लाखांपासून सुरुवात करणारे आता 1500 बद्दल बोलत आहेत, हिंमत असेल तर आतापासूनच वाढीव रक्कम द्या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले. नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल त्यावेळी वाढीव रकमेबाबत विचार होईलच, पण मुख्यमंत्र्यांनी आधी लाडका कॉन्ट्रक्टरबद्दलही बोलावे असे ते म्हणाले.
पुनर्विकासाच्या आराखड्याशिवाय कुणालाही पाऊल ठेवू देऊ नका – अनिल देसाई
पुनर्विकासाचा आराखडा मिळत नाही तोपर्यंत इथे कुणालाही पाऊल ठेवू देणार नाही असा निर्धार करूया, असे याप्रसंगी शिवसेना खासदार अनिल देसाई म्हणाले. मिंधे सरकार आणि अदानींकडून खोटीनाटी आश्वासने देऊन धारावीत सर्व्हे केला जातोय, फोन केले जाताहेत. धाकदपटशा दाखवला जातोय. दादागिरी केली जातेय. सर्व युक्त्या आजमावल्या जाताहेत, पण धारावीकरांनी शांततापूर्ण सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. धारावीकरांना पाहिजे तसाच विकास इथे झाला पाहिजे यासाठी शिवसेना तुमच्याबरोबर आहे, असा विश्वास खासदार देसाई यांनी दिला. फेरीवाल्यांना हटवण्याचा प्रयत्न स्थानिक खासदार करतोय असे पोलीस आणि महापालिका अधिकारी लोकांना सांगत आहेत. हा खोडसाळपणा बंद करा नाहीतर हक्कभंग आणेन, असा इशाराही देसाई यांनी यावेळी दिला.
सर्व्हे करू देऊ नका – विनायक राऊत
धारावी केवळ झोपडपट्टी नाही तर ही उद्योगनगरी आहे. ती अदानींच्या घशात घालण्यासाठी धारावीचा पुनर्विकास नको, असे सांगतानाच कुणालाही सर्व्हे करू देऊ नका, सर्व्हे करून नंबर टाकले तर आपले अस्तित्वच संपले असे समजा, असे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी धारावीकरांना सांगितले. धारावीकरांना दहिसरच्या जंगलात, मिठागरात फेकून अदानींचे मोठमोठे इमले उभारून चौरस फुटाला दीड-दीड लाख रुपये घ्यायचे हे कपट कारस्थान आखलेय. या फसवेगिरीला थारा देऊ नका, असे राऊत म्हणाले.
धारावीचा लढा यशस्वी करूया – बाबूराव माने
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत अभ्यास करून धारावीकरांसाठी 500 चौरस फुटाच्या घरांची मागणी केली आहे. अदानींची माणसे सर्व्हे करायला येताहेत त्यांना पळवून लावण्याचे काम आपण करतोय. पोलिसांना बरोबर घेऊन नंबर टाकले तर त्यावर काळे फासण्याचे कामही धारावीत सुरू आहे. हा लढा आपण यशस्वी करूया, असे आवाहन यावेळी माजी आमदार बाबूराव माने यांनी केले.
500 चौरस फुटांचे घर देणारच
कलानगर धारावीशेजारी आहे. म्हणून तिथेही आता मिंधे लक्ष घालत आहेत असे सांगतानाच, अदानींचे बँक अकाऊंट वाढवण्यासाठी धारावीच्या लोकांना बाहेर काढू देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी बजावले. धारावीत इमारती होतील त्या धारावीकरांसाठीच होतील हा विश्वास आम्हाला पाहिजे, असे ते म्हणाले. धारावीकरांना 500 चौरस फुटांचे घर देणारच, असा शब्द आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला. मुंबईत बहुमजली झोपडपट्टी आहे, त्यांनाही आपण पात्र ठरवणार आहोत असे ते म्हणाले. मिंध्यांचे ते कपट कारस्थान शिवसेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा देतानाच, धारावीचा विकास जागच्या जागीच झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.