शीव रुग्णालयात डॉक्टरला मारहाण

रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना पालिकेच्या शीव रुग्णालयात घडली. याप्रकरणी शीव पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

आज पहाटे एक रुग्ण जखमी अवस्थेत रुग्णालयात आला. त्याला गंभीर इजा झाली होती. त्याच्या जखमेला टाके घालावे लागणार होते. त्याला एका डॉक्टरने आधीच टाके घातले होते. तसेच त्याच्या जखमेत अडकलेला कापूस डॉक्टर काढत होते. ती जखम डॉक्टर मोकळी करत होते तेव्हा रुग्णाला वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याने डॉक्टरला ढकलले व शिवीगाळ केली. तेव्हा त्या रुग्णाचे नातेवाईक घटनास्थळी आले. त्यांनी डॉक्टरशी हुज्जत घातली. महिला नातेवाईकाने रुग्णांसाठी वापरलेला कापसाचा बोळा डॉक्टरला लावला. त्यानंतर डॉक्टरला मारहाण केली. डॉक्टरच्या हाताला दुखापत झाली आहे.

पोलिसांनी दोघांना केली अटक

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता 115 (2) 352, 2 3(5) आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचा प्रतिबंध) अधिनियम 2010 नुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या दोघांची पोलीस चौकशी करत आहेत.