दिल्लीतील नोएडा येथे संतापजनक घटना घडली आहे. पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या एका इंजिनीअरने पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्याबद्दल पत्नीने पोलिसांत तक्रार केली, पण पोलिसांच्या हाती लागताच मला जेलमध्ये टाका, पण पत्नीकडे पाठवू नका, अशी आर्जव त्याने पोलिसांना केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित इंजिनीअर व्यक्ती बसने तिरुपतीला गेला, त्यानंतर ट्रेनने भुवनेश्वरला पोहोचला. तिथून दिल्लीला आला, नंतर नोएडाला गेला. आपला पती बेपत्ता झाल्याची माहिती पत्नीने सोशल मीडियाद्वारे दिली. तसेच पतीला शोधण्यात पोलीस सहकार्य करत नसल्याची तक्रारही तिने केली. दरम्यान, पत्नी मला खूप बंधने घालते. मी एकटा चहाही पिऊ शकत नाही, अशी व्यथा इंजिनीअरने पोलिसांना सांगितली.
अपहरण झाल्याचा होता संशय
पतीचे अपहरण झाल्याचा तिला संशय होता. सुरुवातीला पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे पोलिसांना यश आले नाही. पोलिसांनी बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले, मात्र काहीच हाती लागले नाही. अखेर तो नोएडातील मॉलमध्ये सापडला. काही तासांनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला समज देऊन बंगळुरूला परत नेले.