गोवा राज्यातच विक्रीसाठी परवानगी असलेल्या दारूची तस्करी करून महाराष्ट्रातील कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने आज उघडकीस आणला. भरारी पथकाने विजयनगर चौकात तिघांना दारूची तस्करी करताना पकडून नंतर परिसरातील फ्लॅटवर छापा मारला. फ्लॅटमधील छोटेखानी कारखान्यात बनावट झाकणे लावून दारू सीलबंद करण्यात येत होती. दरम्यान, सांगली जिह्यात बनावट दारूचे पेव फुटले असून, याला केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ढिसाळ कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
सांगली येथे भरारी पथकाच्या कारवाईत अब्दुलरझाक नजरुद्दीन मुलाणी (वय 26, रा. जमगे गल्ली, कवठे महांकाळ), महम्मदकैफ बशीर बागवान (वय 20, रा. थबडेवाडी रस्ता, कवठे महांकाळ), सिद्दीक मुबारक नदाफ (वय 18, रा. दादा चौक, कवठे महांकाळ) या तिघांना अटक करण्यात आलीत. तपासात पुरवठादार व ग्राहक अशा चौघांवरही कारवाई केली. या कारवाईत भरारी पथकाने एकूण 10 लाख 29 हजारांचा मुद्देमाल कारवाईत जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला सांगली येथील विजयनगर चौकातील सत्राळकर स्क्वेअर इमारतीच्या पूर्वेला गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने मोटार क्रमांक (एमएच 13, सीएस 795) थांबवली. मोटारीची तपासणी केली असता, त्यात विदेशी दारूचे 21 बॉक्स आढळले. मोटार तसेच दुचाकी क्रमांक (एमएच 10, ईएच 1501) असा मुद्देमाल जप्त केला. तिघांच्या चौकशीत हा दारूसाठा विजयनगर येथील शिवदत्त आनंद इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भरला जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तेथे छापा टाकला, तेव्हा गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या दारूची तस्करी करून येथे आणली जात असल्याची माहिती मिळाली.
सांगलीत बनावट दारूची सर्रास विक्री; प्रशासन आणि राज्यकर्ते उदासीन
सांगली जिह्यातील अनेक परवानाधारक सरकारमान्य बिअरबारमध्ये अशाच प्रकारची दारूची विक्री सर्रास करीत आहेत. अशी तक्रार नागरिकांतून होत आहे. हे सर्व बिअरबार आणि वाईन शॉप कर्नाटक आणि उडपी मालकांच्या हातात आहेत. मात्र, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱयांचे या सर्व प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत. सांगली जिल्हा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलगत असल्याने हा गोरखधंदा या मंडळींनी मोठय़ा प्रमाणात अवलंबला आहे. याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱयांचे पाठबळ आहे. आज उघड झालेल्या गोवा बनावटीच्या दारू प्रकरणाप्रमाणेच जिह्यात अनेक ठिकाणी बनावट दारूनिर्मिती आणि विक्री होत असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रशासन आणि राज्यकर्ते याबाबत उदासीन दिसून येत आहेत.