Nagar News – बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू, गावावर शोककळा

घरासमोर खेळत असताना साडेतीन वर्षांच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करत त्याला घरापासून सहाशे मीटर अंतरावर फरफटत नेले. बिबट्याच्या या हल्ल्यात चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला दुर्देवी घटना घडल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

राहाता तालुक्यातील चितळी गावात ही धक्कादायक घडली आहे. वनविभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहता तालुक्यातील चितळी येथील मयूर दत्तात्रय वाघ यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा प्रथमेश मयूर वाघ हा सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घरासमोरील अंगणात खेळत होता. याचवेळी घरा शेजीरल डाळींबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्रथमेशवर झेप घेतली आणि पसार झाला. घरातल्यांनी आरडाओरडा करत चिमुकल्याचा शोध सुरू केला. अखेर घरापासून सहाशे मीटर अतंरावर असलेल्या गिनीं गवतात रक्त बंबाळ अवस्थेत प्रथमेश आढळून आला. त्याच्या मानेला जबर जखम झाली होती. त्याला तातडीने श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.