भाजपच्या काही नेत्यांनी अजित पवार यांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवले. त्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे. तर सुनील तटकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना ताकीद द्यावी अशी मागणी केली आहे.
जुन्नरमध्ये आज अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा निघाली. तेव्हा भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांनी कार्यकर्त्यांसह अजित पवारांविरोधात घोषणा दिल्या. तसेच काळे झेंडेही दाखवले. अजित पवार पालकत्वाची भुमिक पाळत नाही असा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
यावर सुनील तटकरे म्हणाले की माझ्या जिल्ह्यातली कधी कधी भाजपची यात्रा निघते तेव्हा आम्ही विरोध करत नाही. पण भाजपच्या या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी ताकीद द्यावी अशी मागणी तटकरे यांनी केली आहे. हे आंदोलन म्हणजे भाजपची स्टंटबाजी आहे अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे. तसेच अजित पवारांकडे कुणी आलं तर दादा त्यांना जात, धर्म इतकंच काय पक्षही विचारत नाही. दादा लोकांना मदत करतात आणि अशा स्टंटबाजीचे प्रकार होत राहतात असेही चाकणकर म्हणाल्या.
दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी हा अजित पवारांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. अशाच प्रकारे आम्ही कुठल्याही भाजपच्या नेत्याविरोधात आंदोलन केले असते तर त्यांनी खपवून घेतले असते का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांना महायुती टिकवायची आहे की नाही यावर स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच या आंदोलनावर फडणवीस यांनी खुलासा करावा अशी मागणीही केली आहे.