अनुसूचित जाती, जमातींचे उप वर्गीकरण करण्याच्या सर्वेच्च न्यायालयाने दिलेल्या वादग्रस्त निकालाच्या निषेधार्थ उत्तर भारतातील अनेक दलित संघटनांनी 21 ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. याला महाराष्ट्रातील आंबेडकरवादी संघटनांनी पाठिंबा दिला. यामध्ये बुधवारी आझाद मैदानात दुपारी 1 वाजता ‘दलित एकता धरणे’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘आंबेडकरवादी भारत मिशन’च्या वतीने भारत बंदच्या दिवशी आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी दलित संघटनांची एक बैठक आज मुंबईतील प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ‘दलित एकता धरणे’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दलित पँथरचे नेते सुरेश केदारे आणि ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी पत्रकाद्वारे दिली.
या बैठकीला रिपाइं (सेक्युलर)चे अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते सयाजी वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे, समाजवादी पार्टीचे राज्य महासचिव राहुल गायकवाड, अॅड. जयमंगल धनराज, सतीश डोंगरे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद सुर्वे, मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगेश पगारे, दिवंगत रामविलास पासवान यांच्या दलित सेनेचे नेते रवी गरुड, सी पी आय एम एल ( लिब्रेशन) नेते श्याम गोहिल हे नेते उपस्थित होते.