पाच लाखांची रोकड असलेली बॅग चर्चगेट स्थानकात सापडली, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांमुळे प्रवाशाला दिलासा

गडबडीत पाच लाख रुपये रोकड असलेली बॅग एक प्रवासी चर्चगेट स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 4 वर विसरला. तिथून प्रवास करणाऱ्या हेमप्रकाश पाटील या प्रवाशाला ती बॅग मिळाली. त्यांनी ती बॅग स्टेशन अधीक्षकांकडे सोपवली. पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी या बॅगेच्या मूळ मालकाचा शोध घेऊन त्याला ती बॅग मिळवून दिली. याबद्दल त्या प्रवाशाने पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चगेट स्थानकात पैशांनी भरलेली बॅग एका प्रवाशाला सापडली. त्याने ती बॅग स्टेशन अधीक्षकांकडे जमा केली. स्टेशन अधीक्षकांनी रेल्वे कंट्रोल रूम आणि आरपीएफ कंट्रोल रूमशी संपर्क साधत हरवलेल्या बॅगेसंदर्भात कुणी तक्रार दाखल केली आहे का, हे जाणून घेतले. त्या वेळी भूपेश अग्रवाल नावाच्या प्रवाशाने आपली बॅग हरवल्याची तक्रार दिल्याची माहिती मिळाली. संपूर्ण खातरजमा केल्यानंतरच अधिकाऱ्यांनी ही बॅग अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.