सुरक्षा यंत्रणा भेदून केमिकल विमानापर्यंत पोहचले

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे एक मोठा अनर्थ टळला. विमानतळ अथवा विमानाने उड्डाण केल्यानंतर मोठी दुर्घटना घडण्यासारखी परिस्थिती शुक्रवारी उद्भवली होती. सुदैवाने विमानात जाण्याआधी लगेज बॅगेतील केमिकलने पेट घेतल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र सुरक्षा यंत्रणा भेदून केमिकल बॉक्स असलेली लगेज बॅग विमानापर्यंत गेल्याने आश्चर्य व्यक्त होतेय.

शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इथोपियन एअरलाईन्सचे  प्रवासी विमान मुंबई ते अदिस अबाबा असे जाणार होते. या विमानातून प्रवास करणाऱया समीर बिश्वास (32) याच्या लगेज बॅगेने विमानात लोड होण्याआधी पेट घेतला. बॅगेतून धूर येत असल्याचे कर्मचाऱयांच्या वेळीच नजरेस पडल्याने त्यांनी तत्काळ आग विझवली. त्यानंतर याबाबत सहार पोलिसांना कळविले. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन त्या बॅगेचा मालक समीर बिश्वास तसेच त्याच्या सोबत असलेले नवीन शर्मा, विश्वनाथ सेंगुतर, नंदन यादव व अखिलेश यादव अशा पाच जणांना ताब्यात घेतले. ज्वलनशील पदार्थ विमानातून नेण्यास मनाई असतानाही त्यांनी केमिकलसारखे घातक पदार्थ बॅगेतून विमान प्रवासासाठी आणल्याने या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अन्य एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, सदर घटनेची आम्ही चौकशी करीत आहोत. तसेच सदरचे केमिकल नेमके कुठले आहे, अटक आरोपी केमिकल विमानातून का नेत होते, त्यांचा नेमका उद्देश काय होता या सर्व बाबींचा  तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कसे गेले केमिकल आत…

नंदन यादव याने तो ज्वलनशील पदार्थ विमानतळाबाहेर समीर बिश्वासकडे सुपूर्द केला. आरोपी सुरेश सिंग याचा सहार कार्गे जवळ ए.एस लॉजीस्टिकचा व्यवसाय आहे. सुरेशने अन्य आरोपी विश्वनाथ सेंजुनधर आणि नवीन शर्मा यांच्या मदतीने ज्वलनशील पदार्थ समीरकडे पोहचविण्यासाठी नंदनकडे दिला होता. तो ज्वलनशील पदार्थ विमानतळापर्यंत वाहतूक करण्यासाठी अखिलेश यादव याने नंदनला मदत केल्याचे तपासात समोर आले आहे.