कर्जबाजारीपणाला कंटाळून मुंबईतील भेंडी बाजारात एका व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. इकबाल मोहम्मद सिवानी असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. जेजे मार्ग पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
इकबाल यांना धंद्यात सतत तोटा सहन करावा लागत होता. यामुळे त्यांच्यावरील कर्ज वाढत होते. वाढत्या कर्जामुळे इकबाल सतत चिंतेत होते. याच तणावातून शुक्रवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास इकबाल यांनी आपल्या कार्यालयातच स्वतःवर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. विशेष म्हणजे इकबाल यांनी स्वतःवर गोळी झाडली तेव्हा त्यांचे कर्मचारीही कार्यालयात उपस्थित होते.
जेजे मार्ग पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी व्यापाऱ्याची पिस्तुल जप्त केली आहे. जेजे पोलिसात एडीआर नोंद करण्यात आला असून पुढील तपास करत आहेत.