बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भेट देणाऱ्या पर्यटकांना आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीच्या मायेची पाखर जवळून अनुभवता येणार आहे. वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांना गुरुवारी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सफरीच्या सेकंडरीमध्ये सोडण्यात आले. त्यामुळे वाघीण व तिच्या कुशीत विसावणाऱ्या बछड्यांना जवळून पाहण्याचा आनंद पर्यटक घेऊ शकणार आहेत.
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ‘टी-24-सी-2’ नावाच्या वाघिणीला दोन वर्षांपूर्वी 22 मार्च 2022 रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. या वाघिणीने यंदा 17 मे रोजी ‘गुड न्यूज’ दिली होती. तिने तीन गोंडस बछड्यांना जन्म दिला होता. ताडोबाच्या वाघिणीची ही ‘गुड न्यूज’ ऐकल्यापासून पर्यटकांना तिच्या बछड्यांना जवळून पाहण्याची उत्सुकता लागली होती. यासाठी तीन महिने प्रतीक्षा केल्यानंतर अखेर गुरुवारी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर वाघीण व तिच्या तीन बछड्यांचे दर्शन पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली (दक्षिण) उपसंचालक रेवती कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सफरीच्या सेकंडरीमध्ये तीन बछड्यांसह वाघिणीला सोडण्यात आले. उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक तथा संचालक जी. मल्लिकार्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, सिंहविहार अधीक्षक निकेत शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले व कर्मचारी उपस्थित होते. वाघीण व तिच्या बछड्यांना पाहण्याच्या संधीचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामार्फत करण्यात आले आहे.