कला केंद्रांतील महिला कलावंतांचे आर्थिक, शारीरिक शोषण; कला-केंद्र चालक, कलावंतांचे निवेदन

जामखेड येथील कला केंद्रांतील महिला कलावंतांचे काही अपप्रवृत्तींकडून आर्थिक व शारीरिक शोषण होत असून, त्यांच्यापासून संरक्षण मिळावे, अशी मागणी विविध कला केंद्रांच्या संचालिका, पार्टी मालकीण व महिला नृत्य कलावंतांनी केली आहे. या कला केंद्रांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले.

यावेळी महाराष्ट्र लोकनाटय़ व सांस्कृतिक कला केंद्र मालक संघटनेचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब काळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ऍड. डॉ. अरुण जाधव, विकी सदाफुले, प्रदीप टापरे, आतिश पारवे, बंडू मुळे आदी उपस्थित होते.

जामखेडमधील कला केंद्रावर पायपेटी, ढोलकी, खंजिरी, टाळ या पारंपरिक वाद्यांव्यतिरिक्त डीजे सिस्टीम किंवा होम थिएटर सिस्टीम वापरली जात नाही. तसेच कला केंद्र मालक व वादक यांच्यामध्ये दरवर्षी मानधनाबाबतचा आर्थिक करार केला जातो. तसेच मास्तर व वस्ताद यांना लाखो रुपये ऍडव्हान्स उचल दिली जाते. काही वादक एक पार्टी सोडून दुसऱया पार्टीकडे जातात. त्यावेळी कला केंद्र मालकांनी दिलेली उचल परत मागितली असता भांडणे, मारामारी होते. यातून पैसे बुडविले जातात. असे असताना काही अपप्रवृत्तीने याबाबत प्रशासनाला चुकीची माहिती देऊन विपर्यास केला आहे. तर, काही अपप्रवृत्ती कला केंद्र संचालिका, पार्टी मालकीण व नृत्यांगना यांचे आर्थिक व शारीरिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने अशा प्रवृत्तीवर योग्य कारवाई करावी, अन्यथा कलावंत रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. यावेळी ज्योती पवार (रेणुका कला केंद्र), संजीवनी जाधव (घुंगरू कला केंद्र), मंगल जाधव (नटराज कला केंद्र), राजश्री जाधव (स्वरराज कला केंद्र), मंदा चंदन (सप्तसूर कला केंद्र), लता जाधव (झंकार कला केंद्र), भामा जाधव (जगदंबा कला केंद्र), अलका जाधव (अंबिका कला केंद्र) यांच्यासह कलाकार उपस्थित होते.