एक हजार वैमानिकांची भरती करणार, रक्षाबंधनाआधीच महिलांना इंडिगोची ओवाळणी

इंडिगो एअरलाईन्सने महिलांना जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्षात कंपनी एक हजारांहून अधिक महिला वैमानिकांची भरती करणार आहे. सध्या इंडिगो एअरलाईन्समध्ये 800हून अधिक महिला वैमानिक आहेत. इंडिगोतील एकूण वैमानिकांच्या संख्येत महिलांचा आकडा जवळपास 14 टक्के आहे. हा आकडा जागतिक टक्केवारीच्या 7 ते 9 टक्क्यांनी अधिक आहे. ही संख्या कंपनी वाढवू इच्छित आहे.

महिलांना जास्तीत जास्त संधी देण्याचे कंपनीचे लक्ष्य असून वर्षभरात कंपनीतील महिला वैमानिकांचा आकडा 1 हजारपार नेण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याचे कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक सुखजीत एस पसरीचा यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे कंपनीतील कामगारांमध्ये विविधता दिसेल तसेच नेटवर्कचाही मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल, अशी आशाही पसरीचा यांनी व्यक्त केली.

इंडिगो कंपनी अभियांत्रिकी आणि विमान कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करणार आहे. प्रत्येक विभागात महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी विभागात महिलांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली असून कंपनीत सर्वात जास्त 800 महिला वैमानिक आहेत.

कंपनीने स्वातंत्र्य दिना दिवशी 77 महिला वैमानिकांना नोकरी दिली. मार्च 2024च्या अखेरीपर्यंत कंपनीत 36 हजार 860 कर्मचारी होते. यात 5,038 वैमानिक आणि 9,363 केबिन क्रू यांचा समावेश होता. 2025पर्यंत इंडिगो एअरलाईन्स एक हजार महिला वैमानिक असणारी कंपनी बनेल असे मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक सुखजीत एस. पसरीचा यांनी सांगितले.

गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीत 713 महिला वैमानिक काम करत होत्या. महिला कर्मचाऱ्यांचा आकडा 44 टक्के असून कंपनीने एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांनाही नोकरी दिली आहे.