दिल्लीच्या हुकूमशाहीविरूद्ध महाराष्ट्र कधी झुकणार नाही, तुम्हाला मोडून काढल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊत यांचा घणाघात

षण्मुखानंद हॉल हे आमचं वानखेडेचं मैदान आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धवजींपर्यंत आमचे सगळे सामने याच मैदानात होतात. हा जो प्रेक्षक आहे तोही आमचाच आहे. पहिलं भाषण ओपनिंग बॅट्समन आमचे उद्धवजी यांचं झालेलं आहे. त्यानंतर प्रत्येक प्लेअर खेळतोच आहे. त्यानंतर आपल्याला काही चिंता नाही. आपण 500 च्या वर जातोय. मंचावर बसलेली वर्ल्डकप जिंकणारी टीम आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. दिल्लीचा एक कप आपण जवळजवळ जिंकलेला आहे. आणि महाराष्ट्राचाही सामना आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा षटकार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज झालेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषणाला उतरताच लगावला आणि षण्मुखानंद हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

आताचा भारतीय जनता पक्ष बनावट आहे, बोगस आहे, चोरांचा पक्ष आहे. आम्ही ज्या भारतीय जनता पक्षासोबत 25 वर्षे माननीय शिवसेनाप्रमुखांच्या आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम केलं, त्या अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी अटल बिहारींच्या कवितेची एक ओळ आठवते. ती आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कदाचित ती मोदी आणि शहांसाठी नसेल. हार नही मानूंगा मै… रार नही ठाणूंगा… आम्ही हार मानणार नाही, आम्ही झुकणार नाही, आम्ही लढत राहू. हा महाराष्ट्र जो आज उभा आहे दिल्लीच्या नव्या हुकूमशाहीविरूद्ध हा महाराष्ट्र कधी झुकणार नाही, हा महाराष्ट्र कधी वाकणार नाही, मोडणार नाही. तुम्हाला मोडून काढल्याशिवार राहणार नाही. हा आजच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याचा खरा मंत्र आहे, असे संजय राऊत म्हणाले.

‘आपली छाती 56 इंचाची होती हे स्वतः मोदीच विसरलेत, ती छाती नाही तर माचिसचा रिकामा खोका’

मगाशी आपल्या वक्त्यांनी आपल्या पंतप्रधानांच्या 56 इंच छातीची आठवण काढली. आपली छाती 56 इंच होती, हे स्वतः मोदी विसरलेत. ती छाती नाही तर माचिसचा रिकामा खोका आहे, त्यात काही नाही. 56 नाय नुसती छाती जरी असती तर देशाची अवस्था झाली नसती. देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर भाषण करताहेत आणि जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या जवानांचं बलिदान होतंय. गेल्या 50 दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे 27 हल्ले झाले. 17 जवान शहीद झाले, 56 जवान जखमी झाले 100 हून अधिक नागरिकांचे मृत्यू झाले. हे 56 इंच वाल्यांचं काम नाही, यांना छातीच नाहीये. त्यांच्या उरल्यासुरल्या छातीतली जी हवा होती ती आपण कालच्या लोकसभा निवडणुकीत काढून टाकली. महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर ती आपण पूर्ण काढून टाकू, असा निर्धार यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला.

‘पिंक सरडा बारामती सोडणार असं ऐकलं’

महाराष्ट्राचे सगळे नेते इथे बसले आहेत. सुप्रियाताई महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत. या बहिणीसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले तुमचे जे लाडके भाऊ आहेत, त्यांनी रंग बदलला. ते पिंक झालेत पिंक. सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो, गुलाबी? आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं ऐकलेलं आहे. कुठे जाणार माहिती नाही. पण गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आपला भगवाच आहे. शेजारच्या तेलंगणमध्ये केसीआर यांचा गुलाबी रंग, पराभूत झाला. पिंक कलर कुठून आणला केसीआरजी? असं मी त्यांना विचारलं होतं. हा कलर राजकारणात चालत नाही, असं बोललो होतो. नाही आम्ही जिंकू, असे ते बोलले होते. मी बोललो पिंक कभी जितेगा नही. एक तो भगवा जितेगा या तिरंगा जितेगा. तिरंग्याच्या रक्षणाला भगवा आहे. हिंदुहृदयसम्राट आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, तिरंग्याचं रक्षण जर कोणी करेल तर भगवा करेल. आणि आम्ही करतोय. त्यामुळे आता पिंकची काळजी नाही, पिंक गेला. आता आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी… आणि मशाल आहेच बुडाला आग लावायला, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

’50 खोके एकदम ओके, रस्त्यावर दिसला तर ठोकेच ठोके’

महाविकास आघाडी उत्तम रितीने पुढे चालली आहे. आमच्यामध्ये कोणतेही वाद, भांडणं असण्याचं कारण नाही. तसं काही असतं तर आपण लोकसभा जिंकलोच नसतो. त्यांचे प्रयत्न खूप होते, प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न होतील. प्रयत्न करत राहा, पण आमच्या ऐक्याला अजिबात तडा जणार नाही. एक तुकडाही, कपचाही उडणार नाही, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढण्यात ज्या प्रकारचं वातावरण होतं, महाराष्ट्राच्या शत्रूशी एकोप्याने एकदिलाने लढायचं आणि जो महाराष्ट्राच्या दुश्मनाशी हातमिळवणी करेल त्याला रस्त्यावर ठोकायचं. 50 खोके एकदम ओके, रस्त्यावर दिसला तर ठोकेच ठोके… आता हे पुन्हा विधानसभेत जाता कामा नये आणि विधानसभा निवडणूक जिंकल्यावर रस्त्यावर दिसता कामा नये. हे वातावरण आपण महाराष्ट्रात निर्माण केल्यावर आपल्याला फक्त विजय प्राप्त करण्यासाठी एकत्र काम करायचं आहे, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले.

‘लाडकी बहीण योजना… यासारखं ढोंग महाराष्ट्रातल्या कुठल्या योजनेत आतापर्यंत झालं नाही’

आमच्यापुढे राज्याचे प्रश्न सगळ्यात जटील उभे आहेत. लाडकी बहीण योजना… या सारखं ढोंग महाराष्ट्रातल्या कुठल्या योजनेत आतापर्यंत झालं नसेल. राज्यात देशात अनेक योजना आपण पाहिल्या. गेले काही दिवस पाहतोय, चर्चा फक्त एकाच योजनेची आहे. कारण सरकारी पैशानं मतं विकत घेण्याची योजना आहे. नाती अशी सरकारी पैशाने विकात घेता येणार नाहीत. या आधी असे प्रयत्न झालेले आहेत. महाराष्ट्रातल्या बहिणींशी, शेतकऱ्यांबरोबर, विद्यार्थ्यांबरोबरचं नातं हे पैशांपलिकडचं आहे. उद्या आपली सत्ता येणारच आहे. अर्थमंत्री आपला होणार आहे. सध्या तिजोरीत जरी पैसे नसले तरी ते कसे आणावे ते अर्थमंत्री म्हणून अनेकदा काम केलेल्या जयंत पाटील यांना माहिती आहे. 1500 चे 3 हजार होतील, 5 हजार होतील, महाविकास आघाडीची एटीएम मशिन बसलेली आहे. ही एकी आपल्याला तीन महिने ठेवायची आहे आणि हेच ऐक्या ठेवायचं आहे. आपल्याला संघर्ष करायचा आहे. महाराष्ट्राला संघर्षाशिवाय काही नाही आणि संघर्षातूनच सगळं मिळालं. महाराष्ट्राने काही करायचा प्रयत्न केला की दिल्लीवाले येतात, आमच्यात तोडफोड करतात. जे ब्रिटिशांनी केलं ते भाजपवाले करतात. फोडा, झोडा आणि राज्य करा. तुम्ही कितीही फोडा, कितीही झोडा आमची एकी तुटणार नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.