महाराष्ट्रातील दरोडेखोरांचं सरकार हटवण्यासाठी महाविकास आघाडी रणशिंग फुंकणार! – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीच्या बाजुने लागले. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र असे राज्य आहे जिथे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा पराभव झाला. त्यानंतर आता आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढू. महाराष्ट्रातील दरोडेखोरांचे सरकार हटवण्यासाठी आम्ही आज रणशिंग फुंकणार आहोत, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यापूर्वी राऊत माध्यमांशी संवाद साधत होते.

ते पुढे म्हणाले की, आज मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. आजच्या मेळाव्याचे यजमानपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे उद्घाटनपर भाषण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील. त्यानंतर इतर प्रमुख नेते मार्गदर्शन करतील. तिन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता असून जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत.

आम्ही तिघांनीही ठरवले आहे की कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत बसवायचे आहे. शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांची शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेचा एकच मुद्दा होता की तिघांनीही एकत्र लढायचे, एकत्र काम करायचे आणि महाराष्ट्रातील दरोडेखोरांचे सरकार हटवायचे. आज आम्ही रणशिंग फुंगतोय. पुढले तीन महिने निवडणुका होईपर्यंत आम्ही एकत्र प्रचाराचे सूत्र पुढे नेऊ, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाचाही समाचार घेतला. ज्यांचे संपूर्ण आयुष्य हप्तेबाजीवर पोसले गेले. हप्तेबाजी, गुत्तेबाजी, ठेकेदारी हे ज्यांच्या राजकारणाचे सूत्र राहिले आणि आताही जे मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी हप्ते गोळा करून, थैल्या गोळा करून दिल्लीच्या चरणी वहात आहेत त्यांच्याबद्दल काय बोलायचे. 10, 100 कोटींना आमदार, खासदार, नगरसेवक विकत घेता, न्याय विकत घेता, कायदा विकत घेता त्यांच्याबद्दल न बोललेले बरे. त्यांना आता जनताच उत्तर देईल, असा घणाघात राऊत यांनी केला.