मुंबईतील एनर्जी केंद्र क्रमांक 151 आणि आरे सरिता केंद्र 38 गेल्या 40 ते 50 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक आणि मराठी माणसे चालवत आहेत. आरे स्टॉलधारक दूध, दुग्धजन्य पदार्थ व आरे सहउत्पादने विक्री करून उपजीविका करत आहेत. गेली अनेक वर्षे ते आपापल्या परिसरात व्यवसाय करत आहेत. मात्र त्यांनी पर्यायी ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे महापालिकेने कळवले आहे. अचानकपणे त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केल्यास त्यांचा पहिल्यासारखा व्यवसाय होणार नाही. त्यामुळे याबाबत सामंजस्याने तोडगा काढून या दोन्ही स्टॉलधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेने दुग्ध व्यवसाय विभागाच्या आयुक्तांकडे केली आहे.
मुंबईत गेली अनेक वर्षं कार्यरत असलेल्या एनर्जी केंद्र क्रमांक 151 आणि आरे सरिता केंद्र 38 यांच्या केंद्रधारकांना पालिकेने 48 तासांच्या आत योग्य त्या पर्यायी जागेवर केंद्र स्थलांतरित करण्यास सांगितले आहे. हे केंद्रचालक बृहन्मुंबई दूध योजनेच्या स्थापनेपासून केंद्रधारक म्हणून कार्यरत आहेत. आरे स्टॉल स्थलांतरित केल्यास वर्षानुवर्षांचा जमलेला उद्योग बंद होऊन आर्थिक नुकसान होणार आहे तसेच नवीन स्थलांतरित ठिकाणी आरे स्टॉलवर विद्युतपुरवठा नवीन घेणे आर्थिक तोटय़ाचे आहे. याबाबत महाराष्ट्र दूध वितरक सेनेने वरळी येथे दुग्ध व्यवसाय विभागाच्या आयुक्तांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष राम कदम, विलास भुजबळ, तानाजी आरज आणि संबंधित केंद्रचालक उपस्थित होते. आयुक्तांनी याबाबत योग्य तो मार्ग काढण्याबाबत आश्वासित केले.