टॅक्सीत विसरलेली बॅग पोलिसांनी शोधून काढली; 25 लाखांचे दागिने केले महिलेला परत

खासगी टॅक्सीत विसरलेली 35 तोळे सोने असलेली बॅग ओशिवरा पोलिसांनी शोधून काढली. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस त्या टॅक्सीचालकाच्या घरापर्यंत पोहचले. ओशिवरा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तक्रारदार गेल्या आठवडय़ात  खासगी टॅक्सीने वसईहून ओशिवरा येथे येत होते. ते त्यांच्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी जोगेश्वरी येथे आले. तेथे साहित्य खाली उतरवून टॅक्सी ती सोडून दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना 35 तोळे सोने असलेली बॅग मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी वसई येथील घरी जाऊन बॅग शोधली, मात्र बॅग मिळून आली नाही. बॅग मिळत नसल्याने त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

वरिष्ठ निरीक्षक मोहन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, खैरे, पवार, भंडारे, जगदाळे, चव्हाण, शेरे, नागरे, पाटील आदींच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. ती सोने असलेली बॅग खासगी कारमध्ये विसरल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी कारचालकाची माहिती काढली. पोलिसांनी त्या चालकाला संपर्क केला तेव्हा त्याने कारमध्ये बॅग नसल्याबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

पुन्हा त्याला पोलिसांनी फोन केला असता त्याने पह्न उचलणे टाळले. त्यानंतर पोलिसांनी त्या चालकाच्या पत्नीशी संपर्क केला. तेव्हा तिने ती बॅग घरी असल्याचे सांगितले. याची माहिती उल्हासनगर येथील स्थानिक पोलिसांना दिली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ती बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली. ती बॅग तक्रारदार यांना परत केली.