‘लाडकी बहीण’ केवळ निवडणुकीसाठी आणलेली योजना

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुढे केलेला जुमला आहे. यांना बहीण निवडणुकीपुरती लाडकी असेल तर सर्व बहिणींनी विचार करून ठणकावून सांगितले पाहिजे की, ही बहीण पदर पसरणारी नाही, तर प्रसंगी पदर खोचून लढणाऱया जिजाऊ, सावित्रीबाई व अहिल्यादेवी होळकर यांच्या परंपरेची आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सुरू केलेली ‘शिवस्वराज्य यात्रा’ मंगळवारी टेंभुर्णी येथील ओमसाई मंगल कार्यालय येथे दाखल झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार कोल्हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, संजय कोकाटे, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, नागेश फाटे, औदुंबर देशमुख, शिवाजी कांबळे, भारत पाटील, संजय पाटील-घाटणेकर, बाळासा पाटील, महिला अध्यक्षा सुवर्णा शिवपुजे, प्रमोद कुटे, बलभीम लोंढे आदी उपस्थित होते.

अमोल कोल्हे म्हणाले, सोलापूर हा शरद पवारांच्या विचारांचा जिल्हा आहे. ही निवडणूक बेरोजगारी व गद्दारांच्या प्रश्नावर तसेच देशातील जवान, शेतकरी यांच्या प्रश्नासाठी आणि उद्योग बाहेरच्या राज्यात जातात, या प्रश्नासाठी लढावयाची आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मोहिते-पाटील आणि पवार घराणे यांच्यात अनेक दशकांचे विश्वासाचे नाते आहे. जनता आमच्याबरोबर आहे आणि हीच आमची ताकद आहे. दररोज दिल्लीत होणारा अपमान बघवत नाही. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर दिल्लीला जातात, मग मते दिल्लीतच मागा, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला आहे. प्रत्येकाचा मानसन्मान ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेल, असेही त्या म्हणाल्या.

काही मंडळींनी विजयसिंह मोहिते-पाटील यांना पवार यांच्यापासून दूर केले. मात्र, यामध्ये जिह्याचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमास कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते.