महायुतीत सुप्त संघर्ष! अजित पवार गटाच्या फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयात रखडवल्याची चर्चा

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राज्य सरकारमधील सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी अजित पवार गटाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा महायुतीमधील सुप्त संघर्ष समोर आला आहे. अजित पवार गटाच्या फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयात रखडवल्याचा आरोप होत आहे. अजित पवार गटाची फाइल कोंडी केल्याची चर्चा आहे.

अजित पवार गटाच्या जवळपास 18 ते 20 फायली मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवभोजन वाढीव थाळीसारखे अनेक निर्णय प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अजित पवार गटाच्या अनेक आमदारांच्या मतदारसंघांमधील कामांच्या फायलीही मुख्यमंत्री कार्यालायत अडकल्याचे सांगितले जात आहे. मंत्र्यांच्या पातळीवर विभागातील निर्णय होत आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर अनेक निर्णय रखडल्याने अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदारांमध्ये मोठी नाराजी असल्याची जोरदार चर्चा आहे. फाइल कोंडीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

रोहित पवारांचा टोला

अजित पवारांनी सही केल्यानंतर त्यावर देवेंद्र फडणवीस सही करणार, अशी प्रथा पूर्वी नव्हती. पण दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर ती मुख्यमंत्र्यांकडे जाते. म्हणजे अजितदादांच्या फाइलनंतर आणखी दोन सह्या करायच्या आहेत. यात एकमेकाची फाइल अडकवून स्वतःची कामं कशी मार्गी लावता येतील, याचच प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले.