राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल व व्हाट्सअप अकाउंट हॅक झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विविध यंत्रणेच्या माध्यमातून पाळत ठेवण्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटावर केला.
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व प्रयत्न केले. आमचा पक्षही फोडला मात्र सुप्रिया सुळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे व प्रभावी कार्यशैलीमुळे त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. ही बाब भारतीय जनता पार्टीच्या पचनी पडली नाही व अजित पवार यांना घेऊन काहीच फायदा झाला नाही, असे मत भाजप व संघाच्या नेत्यांनी व्यक्त केल्याचा टोला महेश तपासे यांनी लगावला. आपल्या राजकीय विरोधाकांवर पाळत ठेवण्याचे आरोप याआधी देखील भारतीय जनता पार्टीवर अनेक वेळा झाले. त्यातच मध्यंतरी पेगासस स्पायवेअरचा उपयोग केला जातो, अशा शंकां उपस्थित होणाऱ्या बातम्याही प्रसिद्ध झाल्याची आठवण तपासे यांनी करून दिली.
महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आमच्या नेत्यांच्या हालचालींवर विशेष करून सुप्रिया सुळे, शिवसेना पक्षप्रममुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर यंत्रणेच्या माध्यमातून पाळत असण्याची शंका नाकारता येत नाही. संसदेमध्ये प्रभावी वक्तव्याच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरले. त्यानंतर लगेचच त्यांचे पती सदानंद सुळे यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी नुकतीच दिली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी महाराष्ट्राच्या गृह विभागाने याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी केली आहे.