पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजेच 30 मे ते 1 जून 2024 दरम्यान कन्याकुमारीच्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये 45 तास ध्यानधारणा केली होती. याची नोंद मोदींची सुट्टी म्हणून की ड्युटी म्हणून करण्यात आली होती, याबाबत एका वृत्तवाहिनीने पंतप्रधान कार्यालयाकडून आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती. या अर्जाच्या उत्तरात पीएमओने पंतप्रधानांनी सुट्टी घेतली नव्हती, तर पंतप्रधान कायम ड्युटीवर असतात असे उत्तर दिले. दरम्यान, मोदींच्या या इव्हेंटबद्दल कोणतेही सरकारी अधिकृत निवेदन काढण्यात आले नव्हते. असे असताना हा इव्हेंट म्हणजे मोदींची सुट्टी नाही ड्युटीच होती, असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने दिले.
मे 2014मध्ये पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारला तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही, असेही पीएमओने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. नरेंद्र मोदींपूर्वीच्या हिंदुस्थानच्या माजी पंतप्रधानांपैकी काही जणांनी त्यांच्या कार्यकाळात सुट्ट्या घेतल्या होत्या आणि त्याची माहितीही जाहीर केली होती.