शासनाच्या आनंदाचा शिधा योजनेत परस्पर पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदाचा शिधा घोटाळा प्रकरणाची व्याप्ती मोठी असून जवळपास 50 लाख रुपयांचा हा सर्व घोटाळा असला तरीही आज दाखल झालेला गुन्हा हा पहिला आहे.
स्वस्त धान्य दुकानदार अर्जुन मारुती शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन काकासाहेब महादेव सानप याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने 45 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
शासनाने गणपती, दिवाळी व पाडवा या सणांना आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानदारांना दिला होता. हा शिधा देताना सर्व माल विकल्यानंतर मालाचे पैसे पुरवठा शाखेच्या बँक खात्यात जमा करण्याचे सांगितले होते.
या घटनेतील आरोपी काकासाहेब सानप हा पूर्वी महसूल प्रशासनात प्रायोगिक तत्त्वावर कामास होता. मात्र त्याच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याने पुरवठा शाखेत काम करण्यास सुरवात केली होती. या ठिकाणी येणाऱ्या तालुक्यातील शेकडो स्वस्त धान्य दुकानदारांचे पैसे बँकेत भरण्याचे काम तो करत होता.
पुरवठा शाखा व वितरक यांच्यात जो व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला होता त्या ग्रुप मध्येही त्याचा समावेश असल्याने त्याचा कोणालाही संशय येत नव्हता. अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी ऑनलाईन तसेच रोखीने लाखो रुपये सानप याला दिले होते. मात्र पैसे देऊनही चलन मिळत नसल्याने दुकानदार हवालदिल झाले होते. त्यानंतर सानप हा फरार झाला होता.
हा सर्व प्रकार मागील वर्षी मार्च ते डिसेंबर या काळात घडला. या प्रकरणी शिरसाठ यांनी सानप याने आपली 45 हजार 214 रुपयांची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सानप याच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.