रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे फिरत असतात. तसेच मोकाट गुरांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ही मोकाट गुरे रत्नागिरी नगरपरिषदेने तात्काळ पकडावीत, अन्यथा आम्ही ती मोकाट गुरे पकडून नगरपरिषदेमध्ये आणून बांधू, असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी दिला. रत्नागिरी शहरातील शिवसैनिकांनी रत्नागिरी नगरपरिषदेवर धडक देत जनतेच्या अनेक समस्यांना वाचा फोडली.
शिवसैनिकांनी रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेतली. यावेळी शहरातील विविध समस्या त्यांनी मांडल्या. रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे फिरत आहेत. काही मोकाट गुरांच्या कानांना टॅग लावलेले आहेत. त्या टॅगवरुन त्या मोकाट गुरांच्या मालकांचा शोध घ्या. त्यांच्या ताब्यात ती गुरे द्या आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. तसेच अन्य मोकाट गुरेही पकडा अशी मागणी करण्यात आली. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यांचाही तातडीने बंदोबस्त करा, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी रत्नागिरी शहरात कोंडवाडा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. नवीन इमारत बांधताना कोंडवाडा पाडण्यात आला. मग त्याची दुसरी व्यवस्था करण्यात आली आहे का? असाही प्रश्न त्यांनी मांडला. गणपती आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकीच्या मार्गाचे रस्ते तातडीने दुरुस्त करा, अशी मागणी यावेळी प्रशांत साळुंखे यांनी केली. मागण्या ऐकून घेतल्यानंतर मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी उद्यापासून टॅग असलेली गुरे पकडायला सुरुवात करतो असे आश्वासन दिले. तसेच 20 ऑगस्टपर्यंत रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला शहर संघटक मनिषा बामणे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, माजी नगरसेवक सलील डाफळे, संध्या कोसुंबकर, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, बावा चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बाकडी केवळ एकाच पक्षाच्या लोकांना
रत्नागिरी नगरपरिषदेकडून बाकडी दिली जात आहेत. ही बाकडी एकाच पक्षाच्या लोकांना दिली जात आहेत. असा पक्षपातीपणा न करता ही बाकडी सर्वांना समान प्रमाणात वाटा, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली. शहरातून कचरा उचलणाऱ्या गाडीबाबतही काही तक्रारी करण्यात आल्या. ही गाडी कमी वेळ थांबत असल्यामुळे अनेकांना कचरा टाकता येत नाही. गल्लीतून आणि इमारतीतून चालत येईपर्यंत कचरा गोळा करणारी गाडी येऊन निघून गेलेली असते. त्यामुळे गाडी थोडावेळ अधिक थांबवावी अशी मागणी करण्यात आली.