केंद्र सरकार लवकरच कोसळेल आणि देशात पुन्हा निवडणुका होतील; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ते देश विकत आहे, अशा पद्धतीने देश विकणारे भाजपवाले आहेत. केंद्रातील भाजप सरकारने ईडी ,सीबीआय यासारख्या यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांवर दाबाव आणला आहे. त्यामुळे दोन टेकूंवर उभे असलेले केंद्रातील सरकार लवकरच कोसळेल आणि देशामध्ये पुन्हा निवडणुका होतील, असा दावा अखिल भारतीय काँग्रेसचे ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजय सिंह यादव यांना केला आहे. नगर जिल्ह्यामध्ये ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कॅप्टन यादव म्हणाले की, देशामध्ये सध्या अस्थिर वातावरण आहे. मोदी यांनी चहा विकला हे सर्वांना माहिती आहे पण आता देशातील महत्त्वाच्या सरकारी कंपन्या विकण्याचा घाट घातला जात आहे. एक प्रकारे हा देश विकण्याचा प्रकार आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. विविध सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांना त्रास देण्याचे प्रकार केंद्र सरकार करत आहे. विरोधकांवर दडपण, दबाव आणला जात आहे. आता त्याचे पडसाद या निवडणुकीमध्ये उमटले , जे गर्वाने सांगत होते की 400 पार जाऊ त्या भाजपवाल्यांना जनतेने वेळीच आवरलं. त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने सरकार बनवले. पण हे सरकार कधीही सोकळू शकते. त्यामुळे देशामध्ये दोन वर्षात लोकसभेच्या निवडणुका लागतील, असा दावाही यादव यांनी केला. काँग्रेस सरकार पाडणार नाही तर हेच सरकार पाडतील, असे सांगून एक चांगलं सरकार काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रामध्ये सत्तेचा माज दिसून येत आहे. आमच्याकडेही 50 वर्षे सत्ता होती. पण अशा पद्धतीने कधी वागलो नाही. यांनी 10 वर्षांमध्ये सत्तेच्या माध्यमातून एक प्रकारे देशांमध्ये विरोधकांना संपवून अघोषित आणीबाणी त्यांनी आणली आहे, असा आरोप सुद्धा यादव यांनी यावेळी केला. तीन राज्यांमध्ये आता निवडणुका होणार आहे. यामध्ये झारखंड हरयाणा व महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. देशाच्या बजेटमध्ये या तिन्ही राज्यांना एक दमडी दिली नाही. मात्र बिहार व आंध्र प्रदेशला यांनी भरभरून मदत केली. त्या राज्यांच्या कुबड्यांच्या आधारे सरकार सुरू आहे. केंद्र सरकारने जनगणना सुद्धा केली नाही 2011 ची जनगणना आजही आहे जर जनगणना केली नाही तर आगामी काळामध्ये म्हणजे 2026 आली डी लिमिटेशन आयोग मग काय निर्णय घेणार हा सुद्धा प्रश्न आहे असेही ते म्हणाले. या केंद्र सरकारने सत्तेमध्ये आल्यानंतर सर्वसामान्यांना मोठा फटका दिला गॅसचे पेट्रोलचे भाव वाढवले मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे याला जबाबदार केंद्र सरकारच आहे असे ते म्हणाले.