सांबराची गोळी घालून शिकार , गगनबावडा तालुक्यातील धक्कादायक प्रकार; तिघांना अटक

गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथे एका गर्भवती सांबराची बंदुकीने शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत सांबराचे शिर धडावेगळे करताना गगनबावडा वन विभागाने तिघांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.

सुभाष बापू पाटील (वय 42), जालिंदर कृष्णात पाटील (वय 30), विठ्ठल कोंडीबा पाटील (वय 38, सर्व रा. निवडे, ता. गगनबावडा) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तिसंगी येथील ‘मीटर माळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱया जंगल परिसरात काल रात्री एका गर्भवती सांबराची बंदुकीने शिकार केल्यानंतर त्याचे शिर धडावेगळे करताना तीन संशयितांना गगनबावडा वन विभागाने रंगेहाथ पकडले. यावेळी दोघे बंदूक व शस्त्रासह पसार झाले होते. यांतील पांडुरंग बाबू पाटील (वय 42) हा वन विभाग साळवण दूरक्षेत्र येथे स्वतः हजर झाला असून, संशयित संजय लहू पाटील हा बंदुकीसह फरार आहे. वन विभागाने वन्यजीव कायद्याप्रमाणे चौघांवर गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा तपास सुरू आहे.

ते सांबर गर्भवती

‘पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी शवविच्छेदन केले असता, मादी जातीचे हे सांबर गर्भवती असल्याचे समोर आले. शिवाय येत्या आठ दिवसांत ती आपल्या पाडसाला जन्म देणार होती,’ असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.